पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांच्या नमुन्यात एक्सबीबी, बीए.2.75 हेच कोरोना विषाणूचे व्हेरियंट प्राधान्याने दिसून येत आहेत. चीनमधील उद्रेकाला कारणीभूत असलेला व्हेरियंट राज्यात प्रबळ नसल्याचे ससूनमध्ये होणार्या जिनोम सिक्वेन्सिंगमधून निदर्शनास आले आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा समावेश देशातील कोरोना जिनोम सिक्वेन्सिंग करणा-या प्रयोग शाळांच्या समूहामध्ये इन्साकॉगमध्ये केलेला आहे.
यामध्ये देशातील 54 प्रयोगशाळा असून, त्यामध्ये पुण्यातील बीजेसह 5 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये राज्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते व त्याचा अहवाल बीजे प्रयोगशाळा समन्वयक असल्याने दर तीन दिवसाला अहवाल शासनाला पाठवते. सध्या ससून रुग्णालयात दररोज 40 ते 50 संशयित रुग्णांच्या नमुन्यांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. यामध्ये नमुना पॉझिटिव्ह येण्याचा दरही नगण्य आहे. ससूनच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत कोरोनाच्या विक्रमी 8 लाख तपासण्या झाल्या आहेत. कोरोना तपासणीत बीजेच्या प्रयोगशाळेने राष्ट्रीय विषाणू संस्था अर्थात 'एनआयव्ही' लाही मागे टाकले आहे.