संधी मिळाली तर मला मराठीमध्ये काम करायला आवडेल : ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी

संधी मिळाली तर मला मराठीमध्ये काम करायला आवडेल : ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'रुबाबदार व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदे झाले, तसे तोटेही झाले. अनेक चांगल्या भूमिका करता आल्या नाहीत. जाहिरात क्षेत्रात काम केल्याने लेखनाची सवय असली, तरी लेखक नव्हतो. केवळ आनंद मिळवण्यासाठी लेखन करायचो. रंगभूमी, चित्रपटातील काम आणि लेखन, मला सगळ्या भूमिका आवडतात. त्या सगळ्यांनी मला भरपूर आनंद दिला आहे,' असे मत ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी नुकतेच व्यक्त केले.

कन्नड, तेलुगू, पंजाबी भाषेतील चित्रपटांसह इटालियन कार्यक्रमाचे काम सुरू आहे. संधी दिली तर मला मराठीमध्ये काम करायला आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मंजुल प्रकाशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कबीर बेदी यांची अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट, दूरचित्रवाणी, व्हिडिओ, डीव्हीडी आणि इंटरनेट असे तंत्रज्ञानाने जगात बदल केले आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. ओटीटी व्यासपीठामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता चित्रपटगृहात जावे लागत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बेदी म्हणाले, 'होनोलुलु येथे मी काम करीत होतो. राकेश रोशनने दूरध्वनी करून तुला 'खून भरी मांग' चित्रपटामध्ये भूमिका करायची आहे, असे सांगितले. त्या वेळी आघाडीची कलाकार असलेल्या रेखासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी नायक आणि खलनायक अशी दुहेरी छटा असलेली भूमिका साकारली. मी महिलांचा आदर करतो. तीन घटस्फोट झाले असले, तरी मी प्रत्येक पत्नीचा चांगला मित्र आहे.' राजीव मिश्रा यांनी प्रास्ताविक केले, तर चेतन कोळी यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news