

सुवर्णा चव्हाण
पुणे: महाराष्ट्रात तब्बल 25 ते 30 हजार नृत्य वर्ग असतील, हे ऐकून आनंद होईलच... हो, हे खरंय... गेल्या काही वर्षांत राज्यभरात नृत्य वर्गांची संख्या वाढली असून, राज्यात झपाट्याने वाढत जाणार्या नृत्य वर्गांमुळे नवे नृत्य कलाकार घडत आहेत. राज्यातील सुमारे 15 ते 20 हजार नृत्य दिग्दर्शकांकडून नृत्य वर्ग चालवले जात आहेत.
इन्स्टाग्राम रील्सचा वाढलेला ट्रेंड, रिअॅलिटी शोजकडे वाढलेला कल, नृत्य क्षेत्रात नाव अन् पैसे कमावण्याची संधी या कारणांमुळे नृत्य शिकण्याकडे ओढा वाढला आहे. पुण्यातही 2500 हून अधिक नृत्य वर्ग असून, लहान मुले आणि तरुण पिढी नृत्याला फक्त कला म्हणून नव्हे तर करिअर म्हणून स्वीकारत आहेत.
आज नृत्य हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित न राहता फिटनेससाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि करिअरच्या नवीन संधी शोधण्यासाठीचा मार्ग बनले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातही नृत्यविषयक ट्रेंड वाढत आहे.
शहरीसह ग्रामीण भागातही नृत्य वर्ग पाहायला मिळत आहेत. शास्त्रीय नृत्याच्या तुलनेत पाश्चिमात्य नृत्य वर्गांची संख्या सर्वाधिक आहे आणि अगदी महिला - तरुणी, ज्येष्ठ नागरिकही झुंबा, बॉलीवूड, लोकनृत्य शिकण्याला प्राधान्य देत आहेत. आज मंगळवारी (दि.29 एप्रिल) साजरा होणार्या ’जागतिक नृत्य दिना’निमित्त दै. ’पुढारी’ने या ट्रेंडचा आढावा घेतला.
याविषयी नृत्य परिषदेचे कार्याध्यक्ष जतीन पांडे म्हणाले, लहान मुलांना नृत्य शिकवण्यासाठी आता पालकही पुढाकार घेत असून, त्यामुळेच राज्यभरात नृत्य शिकवणार्या वर्गांची संख्या वाढली आहे. नृत्याच्या क्षेत्रात अनेक नवीन तरुण पाऊल ठेवत आहेत. पुण्यातही नृत्य वर्गांची संख्या मोठी असून, शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देणार्या वर्गांची संख्या पुण्यात अधिक आहे.
नृत्य वर्गातून नृत्य दिग्दर्शकांना चांगला आर्थिक मोबदला मिळत आहे, नृत्य दिग्दर्शक नवे नृत्य कलाकार घडवतात आणि पुढे जाऊन या कलाकारांना नृत्याचे कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळते. आज अनेकजण नृत्याकडे करिअर म्हणूनही पाहत आहेत. भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी अशा विविध शास्त्रीय नृत्य शिकण्यासह सालसा, हिपहॉप, बॅले, कंटेम्पररी अशा पाश्चिमात्य नृत्य शिकण्याकडे कल आहे.
पुण्यात इथे आहेत नृत्य शिक्षणाचेवर्ग...
पुण्यामध्ये मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, औंध आदी भागांमध्ये नृत्य वर्गांची संख्या वाढली आहे. 8 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थी आणि 18 वर्षांपुढील तरुणांमध्ये नृत्य शिक्षणाचा फंडा रुजला आहे.
वाढती स्पर्धा, सोशल मीडियावरील झपाट्याने व्हायरल होणारे नृत्य व्हिडिओज, विविध नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोंची वाढती संख्या, नृत्य कार्यक्रमातून पैसा कमावण्याची आणि नाव कमावण्याची मिळणारी संधी या कारणांमुळे नृत्याकडे ओढा वाढत आहे. राज्यात शास्त्रीय नृत्याच्या तुलनेत पाश्चिमात्य नृत्य वर्गांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई, पुण्यासह नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे, अमरावती, रत्नागिरी आदी जिल्ह्यांमध्ये नृत्य वर्ग वाढले आहेत.
आशुतोष राठोड, नृत्यदिग्दर्शक