पुणे : देशात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज, आर्थिक स्थिती ही कौतुकास्पद आहे. देशातील इतर जिल्हा बँकांनी या बँकेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सहकार सहसचिव आलोक अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहव्यवस्थापन संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त ते शनिवारी (दि.15) पुण्यात आले होते, त्या वेळी सायंकाळी त्यांनी जिल्हा बँकेस भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. वैकुंठ मेहता संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, प्रा. वाय. एस. पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील पिंपळगाव व पारगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेस आलोक अग्रवाल यांनी शुक्रवारी (दि. 14) भेट दिली. विकास सोसायट्यांकडून शेतकर्यांना खत विक्री, रेशनिंगचे वितरण, सूक्ष्म सिंचन संच, कापड दुकान आदी व्यवसाय चालविले जातात. शेतकर्यांना वाजवी दरात सेवासुविधा पुरविताना सोसायट्यांच्या नफा क्षमतावाढीच्या अनुषंगाने सुरू असलेले यशस्वी उपक्रम पाहून ते प्रभावित झाले. राज्यातील विकास सोसायट्यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.