

पुणे : पुढारी वृत्तेसवा : मिळकत कराच्या (प्रॉपर्टी टॅक्स) धर्तीवर आता जमीनविषयक महसूल कर, अर्थात शेतसारादेखील ऑनलाइन भरता येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे 314 गावांची निवड करण्यात आली असून, गाव नमुन्याची माहिती भरण्याचे (डाटा एण्ट्री) काम सुरू आहे.
जिल्ह्यातील 314 गावांची निवड
शेतसारा हा महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा कर असून, जमिनीच्या क्षेत्रानुसार कर वसूल केला जातो. मात्र, कर अल्प असल्याने अपेक्षित वसुली होत नाही, यामुळे भूमी अभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. या ठिकाणी आलेल्या अडचणी सोडवून संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर आकारण्यात आला. या लहान गावांमध्ये अकृषिक (एनए) जमिनी नसल्याने आता शहरालगतची गावे निवडून एनए करसुद्धा आकारण्याच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतसारा ऑनलाइन भरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे 314 गावांची निवड करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत गाव नमुन्याची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. या सुविधेमुळे सर्वेक्षण क्रमांकनिहाय किंवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसार्याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे याची माहिती संगणकावर मिळणार आहे, अशी माहिती कुळ कायदा शाखाचे उपजिल्हाधिकारी तेली यांनी दिली.