

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : बसमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांचे दागिने चोरणार्या चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. सोनिया अजय कांबळे (वय 31), मीना मिलिंद उपाध्ये (रवय 30), सुमन प्रताप काळे (वय 29), लक्ष्मी बिलीमोर उपाध्ये (21, सर्व रा. राजीव गांधी झोपडपट्टी, विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड परिसरात बसमध्ये होणार्या चोर्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे याबाबत चौकशीचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिसांकडून पथके नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान, वाकड पोलिसांना माहिती मिळाली की, चोरी करणार्या काही संशयीत महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्याजवळ फिरत आहे. तपास पथकाने डांगे चौक येथून बिआरटी बस थांबा येथे थांबलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन विश्वासात घेऊन महिलांकडे तपास केला. पिंपरी – चिंचवड परिसरातील बसमधील चोरीच्या 5 गुन्ह्यांची महिलांनी कबुली दिली. यामध्ये वाकड पोलिस ठाण्यात चार तर चिंचवड पोलिस ठाण्यातील एक गुन्हा आहे. या महिलांकडून चार लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा मुद्देमाल हस्तगत केला. वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.