

Pune News: विरोधक सत्तेत होते तेव्हा महिलांना दुर्लक्षित केले जात होते. मात्र 2014 पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात प्रथमच महिलांची मतपेढी तयार झाली आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, महिला बचत गट, शहरांकडे होणारे स्थलांतर, रोजगार हमी, शिक्षणाचे वाढते प्रमाण तसेच महिलांचा सन्मान वाढविणार्या विविध योजनांमुळे महिलांना महिलांचा हक्क मिळत आहे. त्यांनाही त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली आहे. त्यामुळेच या वेळी महिलांची मतपेढी तयार झाली असल्याचेही डॉ. गोर्हे यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
युतीच्या काळात या घटनेत मोठी घट झाली आहे. तसेच अनेक पीडित महिलेला न्याय देण्याचे काम युती सरकारने केले आहे. लाडकी बहीण योजनामुळे वातावरण बदलले आहे. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे. एकमेकांविषयी बोलताना कोणी अपशब्द वापरल्यास त्यावर निवडणूक आयोग त्याची दखल घेत आहे. ही चांगली गोष्ट आहे.
काँग्रेसमध्ये नीती व नियत नाही
निती आणि नियत असायला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अशी मदत का केली नाही? 2014 आधी अनेक वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले. मग त्यांनी अशा योजना का सुरू केल्या नाहीत. त्यांची नियत नाही, अशी टीका गोर्हे यांनी केली.