

Pune News: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12 नोव्हेंबर रोजी दोन सभा होणार आहेत. सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी एक सभा सोलापूर येथे, तर पुणे व सातारा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी पुण्यात प्रचारसभा होणार आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, महापालिकेतील माजी सभागृहनेते गणेश बिडकर आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
पांडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 12 नोव्हेंबर रोजी सोलापूर व पुणे येथे दोन सभा होणार आहेत. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4 वाजता होणार्या सभेची तयारी झालेली आहे. या सभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
घाटे म्हणाले, सभेसाठी संघटनात्मक रचना केल्या आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी 20 हजार सन्मानिका उद्या पोहचवल्या जाणार आहेत. सभेची निमंत्रने शहरात दीड लाख घरांपर्यंत पोहचणार आहोत. ही सभा पुणे शहर व जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आहे.
मानकर म्हणाले, मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून प्रयत्न करत आहोत. या सभेचा फायदा सर्व मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे. एक लाख ते सव्वा लाख नागरिक सभेस उपस्थित राहतील, असा आमचा प्रयत्न आहे.