कात्रज – कोंढवा रस्त्यावर ट्रकने महिलेला उडविले
कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज – कोंढवा रस्त्यावरील माउलीनगर चौकात रविवारी (दि. 13) रात्री दहाच्या सुमारास भरधाव ट्रकने पादचारी महिलेला उडविले. या अपघातात प्रभावती पांडुरंग अनभुले (वय 70, रा. विग्नहर्तानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका आठवड्यात झालेला हा तिसरा अपघात असून, तिसरा बळी आहे. गेल्या साडेचार वर्षांत या रस्त्यावर 58 अपघातांत 26 जणांचा बळी गेला आहे.
रविवारी झालेल्या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार खासगी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सदर महिला गेली होती. कार्यक्रम संपून त्या घरी जात असताना मुख्य रस्त्यावर ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढमे, अतुल थोरात आदींसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक अपघातानंतर पळून जात होता; परंतु पोलिसांनी त्याला कोंढवा भागातच ताब्यात घेतले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
हेही वाचा

