

पुणे: पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. प्रमोद विठ्ठल कोंढरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. (Latest Pune News)
दोन दिवसापूर्वी शहरात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दौरा होता. त्यावेळी फिर्यादी महिला अधिकारी बंदोबस्तावर होत्या. यावेळी कोंढरे याने महिला पोलिस अधिकाऱ्याच्या जाणीवपूर्वक पाठीमागे उभे राहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.