

पुणे: महानगरपालिकेच्या करवसुली विभागामार्फत मिळकत कर गोळा करण्यास 1 मेपासून सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, मिळकतकर भरताना सवलत मिळविण्यासाठी केवळ 6 दिवस बाकी राहिले आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत महापालिकेला तब्बल 932 कोटींचा मिळकतकर मिळाला आहे. यात ऑनलाइन पद्धतीने सर्वाधिक मिळकत कर भरण्यात नागरिकांनी पसंती दिली आहे.
मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. यावर्षी चालू आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला 3 हजार 250 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. (Latest Pune News)
अधिकाधिक नागरिकांनी मिळकत कराची रक्कम महापालिकेकडे भरावी, यासाठी महापालिकेने सुरुवातीचे दोन महिने मिळकत कर भरणार्यांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. या सवलतीचा अनेकांनी फायदा घेत कर भरला आहे. 1 मे पासून आतापर्यंत 5 लाख 79 हजार 588 नागरिकांनी तब्बल 932 कोटी 39 लाख रुपयांचा कर महापालिकेकडे भरला आहे.
महापालिकेकडे वेगवेगळ्या प्रकारची सुमारे 17 हजार कोटींची थकबाकी आहे. ही संपूर्ण थकबाकी वसूल होणे अशक्य आहे. या थकबाकीत मोबाईल टॉवरच्या मिळकतकराची थकबाकी सर्वाधिक आहे. तब्बल 4 हजार कोटींची थकबाकी आहे.
तर दुबार मिळकतकराची थकबाकी 4 हजार कोटी आहे. महापालिकेने जादा मिळकतकर आकारल्याने न्यायालयात दावे दाखल असेलेल्या मिळकतकराची दीड हजार कोटींची व महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 1900 कोटींची थकबाकी आहे.
जून महिन्यांनंतर थकबाकी वसुलीचे नियोजन
थकीत मिळकत करांपैकी दुबार तसेच समाविष्ट गावांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले. जून महिना संपल्यावर थकबाकी वसूल करण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याचे मिळकतकर विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
सवलतीच्या दरात मिळकतकर नागरिकांना भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत असणार आहे. नागरिकांना त्याचा फायदा घेता यावा, यासाठी ऑनलाइन, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- अविनाश सपकाळ, उपायुक्त मिळकत कर