

पुणे: लग्न जुळवणार्या संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियात फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्याचा प्रकार घडल्यानंतर अखेर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अमित शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिला आणि आरोपी शेंडगे यांची गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली होती. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले.
त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका हॉटेलमध्ये महिलेला नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिची छायाचित्रे त्याने मोबाईलवर काढली. त्यानंतर शेंडगेने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. याच कारणास्तव त्याने तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले.
महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहाबाबत विचारणा केल्यास विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.