पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृती ही जगातील पाच संस्कृतीत खूप वेगळी आहे. कारण, ती वर्ण, वंश, जात यावर नव्हे तर प्रज्ञा, ज्ञान आणि श्री राम विचारावर आधारित आहे. त्यामुळेच जगात सर्वश्रेष्ठ आहे. अहम् ब्रह्मास्मी, तत्त्वमसी म्हणजे मी ब्रह्म आहे. मी आणि तू एकच आहे. हाच संदेश आपल्या संस्कृतीने जगाला दिला, असे मत केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ महंमद खान यांनी येथे व्यक्त केले. पुणे शहरातील सहजीवन व्याख्यानमालेत मंगळवारी डॉ. आरिफ महंमद खान यांनी भारतीय संस्कृतीवर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
भगवद्गीता, श्रीमद भागवत, वेद, उपनिषदांतील संस्कृत श्लोक, वचने आणि ऋचा म्हणत सहज सोप्या भाषेत अर्थ त्यांनी सांगितला. तेव्हा गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानावरील श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आदि शंकराचार्य, प्रभू श्री राम, स्वामी विवेकानंद यांनी दिलेली शिकवण हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी देखिल भारतीय संस्कृतीबद्दल हेच विचार मांडल्याचे अनेक दाखले दिले. सुमारे पाऊण तास त्यांनी श्रोत्यांना जगात श्रेष्ठ भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले. श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात व शेवट राष्ट्रगीताने झाली. सरस्वतीपूजनानंतर सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी राज्यपाल डॉ. आरिफ महंमद खान यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.
श्री रामाबद्दल विचार प्रकट करताना ते म्हणाले, मानवी जीवनातील गुंतागुंत महाभारतात आहे; तर महत्त्वाकांक्षा आणि प्रेरणा रामायणात आहे. स्नेह, दया, ज्याच्याजवळ आहे, जो सुखाचा स्रोत आहे, जो प्रजेसाठी आपल्या प्राणापेक्षा प्रिय जानकीचा त्याग करू शकतो. असा आदर्श राजा श्री राम आपल्या देशात जन्मला. अशा राजाची देशाला गरज आहे. माझा मुलगा अशाच विचारांचा व्हावा, असे प्रत्येक मातेला वाटावे असाच श्री राम आहे. कारण, तो वास्तविकता प्रेरित करणारा आहे. पुढच्या पिढीत ज्याचे व्यक्तीत्व परावर्तित व्हावे अशीच शिकवण श्री रामाने दिली.
ते म्हणाले, जगात एकूण पाच संस्कृती आहेत. इराणी, चिनी, रोम, तुर्की आणि भारतीय. यात फक्त भारतीय संस्कृती ही ज्ञान आणि प्रज्ञा, या विचारावर आधारित आहे. तर बाकीच्या संस्कृती वर्णावर आधारलेल्या दिसतात. आपल्या देशात दर पंधरा किलोमीटरवर बोली बदलते. त्यामुळेच जात-पात, धर्म-वर्णभेद आपली संस्कृती मानत नाही. अहम् ब—ह्मास्मी, तत्त्वमसी हीच आपली शिकवण आहे. आदि शंकराचार्यांनी देशात चार मठ स्थापन करून प्रत्येकात एकच आत्मा आहे, हीच शिकवण दिली. जो आत्मा माणसात आहे तोच
पशू, पक्षी आणि दगडातही आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा