

परिंचे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा, गहू, मिरची, टोमॅटो तसेच इतर तरकारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्या पडणार्या कडाक्याच्या थंडीमुळे ही सर्व पिके जोमदार दिसत आहेत. त्यामुळे वीर, परिंचे, माहूर, काळदरी, बांदलवाडी, टोणपेवाडी, यादववाडी, पिंपळे, पांगारे येथील शेतकरी सुखावला आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र थंडीची लाट असली, तरी दक्षिण पुरंदरमध्ये दिवसभर गारवा जाणवत आहे. काही भागांमध्ये धुके पसरत असल्यामुळे काही पिकांवर रोग पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना रोगप्रतिबंधक औषधे मारण्याच्या तयारीला लागले आहेत.
मध्यंतरी कांद्याचे भाव तेजीत होते, त्यामुळे अनेक शेतकर्यांनी कांद्याला मोठ्या प्रमाणात खते आणि औषधे देऊन पीक हाताशी आणले आहे. परंतु, कांदा निर्यातबंदीमुळे पुन्हा कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सद्य:स्थितीत थंडीमध्ये पिके जगण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव द्यावा आणि शेतकर्याला कर्जबाजारी होण्यापासून वाचवावे, असे वीर येथील प्रगतशील शेतकरी शंभुराजे धुमाळ यांनी या वेळी सांगितले.
शाळकरी लहान मुलांचे हाल
अनेक गावांतील मुले मराठी माध्यमांबरोबरच इंग्लिश माध्यमांमध्येही सकाळी शाळेत जातात. नेहमीपेक्षा या वेळी थंडी जास्त असल्यामुळे लहान मुलांना लवकर उठून शाळेमध्ये जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागातील शाळांनी वेळापत्रक सकाळी दहानंतर चालू करावे, अशी मागणी बहुतांश पालकांनी केली आहे.