

पिंपरी : चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. 24, 25, 26 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी मटणासह ओल्या पार्ट्या सुरू आहेत. दारूच्या नशेत असलेल्या टोळक्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच, निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी चार दिवस वाईन्स शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात 24, 25, 26 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार गुन्हा दाखल
बंद कालावधीत चिंचवड मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात मद्य विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित परवानाधारकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच, आदेशाचे उल्लंघन करणार्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.
शेजारच्या मतदारसंघात मात्र मद्य विक्री सुरू
मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात व शांततेत पार पडावी, या उद्देशाने चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील मध्यविक्री चार दिवस बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, चिंचवड लगतच्या पिंपरी आणि भोर, वेल्हा, मुळशी या मतदारसंघात मद्य विक्री सुरू राहणार आहे. त्यामुळे मद्यपींना मद्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळे केवळ एका मतदार संघातील मद्याविक्री बंद ठेऊन प्रशासनाचा उद्देश कसा सफल होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.