

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी, अवसरी खुर्दसह अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना पावसाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. पूर्व भागातील अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, निरगुडसर, देवगाव, लाखनगाव, काठापूर, खडकवाडी आदी गावांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा घोडनदी व डिंभे उजवा कालव्यातून होत आहे.
तर लोणी धामणी, शिरदाळे, पहाडदरा, मांदळवाडी, वडगावपीर ही गावे पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत. पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले असूनदेखील या गावांमध्ये अद्यापि पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांच्या चार्याचीही मोठी टंचाई निर्माण झालेली आहे.
अवसरी खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारा मोरदरा पाझर तलाव अटत चालला आहे. त्यामुळे गावात तीन दिवसांतून एकदा फक्त अर्धा तास पाणीपुरवठा होत आहे. तलावात डिंभे उजवा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी तलावात पाणी न सोडल्याने गावाला तीन दिवसांनी अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी घोडनदीवरून पाइप लाइनद्वारे मुधारा डोंगराजवळ अडीच ते तीन लाख लिटर पाण्याची टाकी पाणी, जलशुद्धीकरण टाकी उभारावी. त्याद्वारे गावाला कायमस्वरूपी सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.फफ
पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले असूनदेखील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अद्याप पाऊस पडला नसल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करावेत.
बाळासाहेब मेंगडे, सरपंच, मेंगडेवाडी