पिंपरी : मतदानाचा टक्का वाढणार की घसरणार? टक्केवारीवर विजयाचे गणित अवलंबून

पिंपरी : मतदानाचा टक्का वाढणार की घसरणार? टक्केवारीवर विजयाचे गणित अवलंबून
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान होत आहे. पोटनिवडणूक असल्याने उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार करीत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे मतदानांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानाच्या टक्केवारीवर उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरणार आहेत.

पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्साह कमी असल्याने मतदान कमी होते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीलाही मतदान कमी होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, प्रमुख तीन उमेदवार हे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर व वाकड अशा वेगवेगळ्या भागांतील आहेत. तसेच, उर्वरित 26 अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नेतेमंडळी प्रचारात उतरली होती. त्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. तसेच, मतदारांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व भेटवस्तूंचे वाटप केल्याचे बोलले जात आहे.

या सर्वांचा परिणाम म्हणून मतदानासाठी नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने जनजागृती मोहीम होती घेतली होती. या सर्व कारणांमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज राजकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून विजयाची गणिते मांडली जाणार आहेत.

अखेरच्या क्षणापर्यंत छुपा प्रचार सुरूच
उघड प्रचार बंद झाल्याने छुपा प्रचार अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. उमेदवार व त्यांचे खास कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. गुप्त भेटी घेऊन तसेच, मोबाईलवर संपर्क साधला जात आहे. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात होता.

उमेदवारांकडून एसएमएसचा भडीमार
निवडणूक विभागाने घरोघरी जाऊन व्होटर स्लीप वाटल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अनेक घरांपर्यंत त्या स्लीपा अद्याप पोचलेल्या नाहीत. उमेदवारांनी मतदारांपर्यंत स्लीपा वाटप केले. तसेच, मोबाईलवर एसएमएस करीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारांच्या एसएमएसचा भडीमार करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, हे समजले आहे. तसेच, अनेक नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेतली.

ड्राय डेमुळे सीमेपलीकडील भागांतून दारूचे पार्सल
निवडणूक असल्याने चिंचवड मतदारसंघात आचारसंहिता लागू आहे. शुक्रवार (दि.24) ते रविवार (दि.26) असे तीन दिवस या मतदारसंघ क्षेत्रात ड्राय डे घोषित करण्यात आल्याने देशी व विदेशी दारू विक्रीची सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिक मतदारसंघाबाहेरील भागांत जाऊन दारूची खरेदी करीत आहेत. त्यामुळे सीमेवरील दारू दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. मतदान केंद्रापासून 100 ते 200 मीटर अंतरावर वाहने आणण्यास बंदी करण्यात आली आहे.

दिव्यांग, वृद्धांच्या मदतीसाठी स्वयंसेवक
अंध, अपंग या दिव्यांग मतदार तसेच, वयोवृद्ध व आजारी मतदारांसाठी निवडणूक विभागाने स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. सर्व केंद्र तळमजल्यावर असून, ते रॅम्पने जोडण्यात आले आहेत. तसेच, केंद्रांच्या ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. बसण्यासाठी खुर्च्या व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.

28 उमेदवार असल्याने दोन मतपत्रिका
उमेदवार 28 असल्याने दोन बॅलेट युनिटचा (मतपत्रिका) वापर करण्यात आला आहे. पहिल्या मतपत्रिकेवर 1 ते 16 उमेदवार आहेत. तर, दुसर्‍या मतपत्रिकेवर 17 ते 28 असे 12 उमेदवार आहेत. शेवटी 29 व्या क्रमांकावर 'नोटा' (एनओटीए-नॅन ऑफ द अबाव्ह-वरीलपैकी कोणीही नाही)चे बटन आहे. वरील सर्व उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याने नोटाचे बटन दाबण्याचा पर्याय मतदारांना देण्यात आला आहे. मतपत्रिकेवर अनुक्रमांकानुसार उमेदवारांचे नाव मराठी व इंग्रजी भाषेत आहे. तसेच त्यांचे छायाचित्र व चिन्ह आहे. या एकूण28 उमेदवारांमध्ये सर्वांधिक 25 पुरूष उमेदवार आहेत. तर, 2 महिला 1 तृतीयपंथी उमेदवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news