बारामती: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र येणार, अशी जोरदार हवा सध्या रंगली असतानाच राजकारणात दुभंगलेले बारामतीचे पवार घराणेही पुन्हा एकत्र येणार का? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आ. रोहित पवार यांची एक्स पोस्ट, खा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निरनिराळ्या बैठकांच्या निमित्ताने वारंवार होणार्या भेटी, यामुळे पवारही लवकरच एकत्र येतील, याची चर्चा होत आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट आहे, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूसंबंधित सोमवारी (दि. 23) बारामतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यानिमित्त दोन्ही पवार एकत्र येतील का? अशा चर्चा आता रंगल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांनी ठाकरे कुटुंब एकत्र आले, तर हा सुवर्णक्षण असेल, त्यासाठी राज्यातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे, असे टि्वट केले होते. यावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मी स्वागतच करते..! खरेतर हे मीच सुरुवातीला बोलले आहे. दोघेही एकत्र येत असतील, तर तो सुवर्णक्षणच असेल, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
या वातावरणातच ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या महिनाभरात निरनिराळ्या संस्थांच्या बैठकांच्या निमित्ताने भेटी होत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत तर त्यांनी एकाच व्यासपीठावर शेजारी बसत एकमेकांशी संवादही साधला, तर सोमवारी वसंतदादा शुगर संस्थेच्या बैठकीत त्यांनी बंद दाराआड चर्चाही केली. यामुळे बारामतीचे पवार देखील लवकरच एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.