

Maharashtra political drama
पुणे: राज्यात गेल्या पंधरवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनवेळा एकत्र आले आहेत. सोमवारीही (दि. 21) येथील साखर संकुलमधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कार्यालयामध्ये ‘कृषी क्षेत्रात एआयचा वापर’ या बैठकीनिमित्त दोन्ही पवार पुन्हा एकत्र आले; शिवाय बैठकीनंतर व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये दोघेही शेजारी शेजारी बसून कारखाने, अधिकारीवर्ग व अन्य लोकांशी संवाद साधत राहिल्याने दोन्ही पवारांमधील दुरावा संपुष्टात येऊन अधिकची जवळीकता वाढल्याने ते दोघे पुन्हा एकत्र येणार काय? यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बैठकीनंतर पत्रकारांनी अजित पवार यांना याविषयी छेडले. गेल्या 15 दिवसांत रयत संस्था, जय पवार यांचा साखरपुडा आणि व्हीएसआयच्या बैठकीनिमित्त तुमची आणि शरद पवार यांची तीनदा भेट झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात की, काका आणि पुतणे हे एकत्रच आहेत. तुम्ही एकत्र येणार आहात काय? असे विचारले असता त्यावर अजित पवार म्हणाले, परिवारातील साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने परिवार म्हणून एकत्र येणे ही आपली संस्कृती, परंपरा आहे. वर्षानुवर्षे ते चालत आले आहे. परिवार म्हणून सर्वजण एकत्र येतो. बाकीच्यांनी त्यावर काहीही चर्चा करण्याचा प्रश्न नाही. हा पवार परिवाराचा अंतर्गत विषय आहे.
शरद पवार हे ज्या संस्थांवर अध्यक्ष आहेत, तेथे मी सदस्य, ट्रस्टी म्हणून काम करतो. मी तेथे उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेवर अन्य पक्षांचेही प्रतिनिधी असून, साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेचे अध्यक्षपद यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर शरद पवार हे भूषवत आहेत.
शिक्षण कशा पद्धतीने मुला-मुलींना देता येईल, निधी कसा उभा करता येईल, यावर बैठक झाली. आजची बैठक ही एआय तंत्रज्ञानावर झालेली आहे. राज्यातील शेतकर्यांना ज्या तंत्रज्ञानातून फायदा होणार असेल, पाणी, खतांची बचत होणार असेल, अशा तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे आणि अशा बैठकांना एकत्र बसावे लागते. अनेकदा पंतप्रधानही इतर मान्यवरांना बोलावून चर्चा करतात. मुख्यमंत्रीही सर्वपक्षीयांना बोलावून चर्चा करतात.
काही विषय हे राजकारणाच्या पलिकडे पाहायचे असतात. सर्व गोष्टींत राजकारण आणायचे नसते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. जनतेला काही गोष्टींना आम्ही बांधील असून, त्याची पूर्तता करण्याकरिता अनेकांमध्ये अनुभवाबद्दलचे बोल असतील, काहींना अभ्यास असेल, तर त्या माहितीची आणि विचारांची देवाणघेवाण करणे हे योग्य आहे. संसुस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा असला पाहिजे, त्यादृष्टीने वेगवेगळ्या बैठकांना मी तरी हजर असल्याचे ते म्हणाले.
‘मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा’
मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, केंद्रात आपले सरकार असून, राज्य सरकारही आपलेच आहे. तसेच पोलिस यंत्रणा देखील आपल्या ताब्यात असल्याने याची चौकशी करण्यात यावी. यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
‘थोपटे यांनी काय करावे? हा त्यांचा अधिकार’
भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याबद्दल विचारताच पवार म्हणाले, मग मी काय करू? थोपटे हे एका राजकीय पक्षाचे आमदार होते. आता ते पराभूत झाले. आता त्यांनी काय करावे? तो त्यांचा अधिकार आहे. मला त्यावर कॉमेंट करण्याचे काहीच कारण नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.