एलोरा, युनिकॉर्नवरील मेहरबानी भोवणार? आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

एलोरा, युनिकॉर्नवरील मेहरबानी भोवणार? आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, नाईट राउंड अधिकारी यांना कल्याणीनगर येथील एलोरा आणि युनिकॉर्न हे पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे कसे निदर्शनास आले नाहीत? स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळते, मग त्यांना का मिळत नाही ? हा मोठा सवाल आहे. आम्ही सुरुवातीपासूनच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. हॉटेल, पबचालकांना नियमात काम करावे लागेल. असे असतानादेखील स्थानिक पोलिस ठाण्याचे लोक त्यांच्यावर मेहरबानी दाखवत असतील, तर त्यांची खैर केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

त्यामुळे, एलोरा आणि युनिकॉर्नचे प्रकरण येरवडा पोलिसांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे दिसून येते. याप्रकरणी, संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या चौकशीचे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी बुधवारी (दि.10) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेतला आहे. तयार करण्यात आलेल्या नियमावलींचे उल्लंघन करूनही काही हॉटेल, पबवाले पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरू ठेवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिस ठाण्यांना दिले आहेत. मात्र, त्यानंतरदेखील स्थानिक पोलिस ठाणे त्यांच्यावर मेहरबानी दाखवत असल्याचे दिसते.

नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात. त्यांच्या निदर्शनास असे प्रकार येतात. मग स्थानिक पोलिसांना हे का दिसत नाही. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी ठरवावी लागेल, असे म्हणत पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना इशाराच दिला आहे. यापुढे आदेशानंतरदेखील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले. हॉटेल-पब पहाटेपर्यंत डीजेच्या तालावर मद्यधुंद रात्र जागविताना दिसून आले, तर त्याची धग पोलिस ठाण्याच्या प्रभारींनादेखील बसणार, हे मात्र नक्की आहे. शहरातील हॉटेल्स, पबसंदर्भात पोलिस आयुक्तांनी नियमावली तयार केली आहे. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली. याबाबत 144 चे आदेशदेखील लागू करण्यात आले. मात्र, पबवाल्यांनी चक्क पोलिस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रात्री दीडनंतरही आपला धांगडधिंगा सुरू ठेवल्याचे येरवडा कल्याणीनगर येथील एलोरा, युनिकॉर्नमुळे समोर आले.

पोलिस आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राईक

दरम्यान, या दोन्ही पबच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर स्वतः पोलिस आयुक्तांनी आदेश देत सर्जिक स्टाईक करत सोमवारी (दि. 8) रात्री एलोरा आणि युनिकॉर्न या दोन्ही पबवर गुन्हे शाखेने कारवाई केली. दोन ठिकाणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या गुन्ह्यात कल्याणीनगर येथील आयटी पार्क येथील सेरेब्रममध्ये आठव्या मजल्यावर एलोरा रूफ टॉप हॉटेल कम पब आहे. शहरातील सर्व पबला रात्री दीड वाजेपर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे. असे असतानादेखील या पबने दीड वाजल्यानंतरही पब सुरू ठेवला. यामध्ये मोठ्याने साउंड सिस्टीम वाजवून रहिवाशांना त्रास दिला. यामध्ये सामाजिक सुरक्षा विभागाने 17 लाखांची साउंड सिस्टीम, 3 लाख 87 हजारांचे हुक्का फ्लेव्हर, हुक्का पॉट असे साहित्य जप्त केले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news