कोल्हापूर आणि हातकणंगलेत कोण मारणार बाजी? उत्कंठा वाढली | पुढारी

कोल्हापूर आणि हातकणंगलेत कोण मारणार बाजी? उत्कंठा वाढली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतून कोण बाजी मारणार, याची उत्कंठा आता वाढत चालली आहे. या मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. मतदारांसह उमेदवारांना आता अवघ्या 72 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सट्टा बाजारासह पैजा, चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान प्रशासनाकडून मतमोजणीची सोमवारी (दि. 3) रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांसाठी मतदारांनी उत्साहाने आणि चुरशीने मतदान केले. मतदारांना आता मतमोजणीचे वेध लागले आहेत. मंगळवारी (दि. 4) मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामात, तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

नागरिक, कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली

मतमोजणीला आता 72 तास उरले आहेत. यामुळे नागरिक, कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढत चालली आहे. वाढत्या उत्कंठेबरोबर नागरिक, कार्यकर्त्यांत मतमोजणीची चर्चा आहे. कोण विजयी होणार, कोणाला कुठे फटका बसणार, कोणाला कुणाचा फायदा होणार, कोणाला कुठे लीड मिळणार, कुणाचे कुठे लीड कमी होणार, अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहेत. त्यातून एकमेकांत पैजा लागत आहेत. त्यात दिवसागणिक भर पडत चालली आहे. चर्चा, पैजांसह सट्टा बाजारातही तेजीचे वातावरण आहे. शनिवारी अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्यानंतर सट्टा बाजारातील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.

मतमोजणीसाठी 686 व 1200 पोलिस नियुक्त

मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांसाठी 686 कर्मचारी, तर 1200 पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या कर्मचार्‍यांकडून सोमवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रांवर टेबलवर बसून मतमोजणीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

84 मतदान केंद्रांची एक फेरी

दोन्ही मतदारसंघांत सहा विधानसभानिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतमोजणी केंद्रांत 14 टेबलवर मतमोजणी होईल. यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत 84 मतदान केंद्रांची एक फेरी होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर मतदारसंघात 26, तर हातकणंगले मतदारसंघात 23 फेर्‍या होणार आहेत.

Back to top button