येरवडा : विद्यार्थ्यांसाठी ‘निर्भय अभियान’ राबविणार : पोलिस उपायुक्त बोराटे
येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'आगामी शैक्षणिक वर्षापासून येरवडा, विश्रांतवाडी, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद , खडकी आणि चतु:शृंगी या सात पोलिस ठाण्यांत 'निर्भय विद्यार्थी अभियान' सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मंडळांच्या मदतीने हे अभियान राबविण्यात येत आहे,' अशी माहिती परिमंडल 4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
येरवडा पोलिस ठाण्यात झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या बैठक प्रसंगी ते बोलत होते. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर, पौर्णिमा गादिया, विवेक देव, डॉ. राजू अडागळे आदी या वेळी उपस्थित होते.
बोराटे म्हणाले, 'शालेय वयात मुलांना मूल्यशिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्यास ते चांगले नागरिक घडू शकतात.
सध्या शहरात बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, बाललैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.' मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, सुराज्य सर्वांगीण विकास संस्था, दिशा, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी, यार्दी व कास्प, सिफार, मुस्कान, ग्रीन तारा, महिला कल्याण संस्था, सीवायडीए, सर्व सेवा संघ, लाइट हाऊस, शांताई आदी संस्थांच्या प्रतिनिधींसह विमाननगर रहिवासी संघ, खराडी रहिवासी संघ, महिला दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप कुर्हाडे यांनी केले. बाळकृष्ण कदम यांनी आभार मानले.
प्रत्येक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण
शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेतील शिक्षकांना प्रेरक प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात मूल्यशिक्षण, ताणतणाव व्यवस्थापन, लैंगिक शिक्षण, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो), व्यसनमुक्ती आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. शिक्षक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समस्या या अभियानांतर्गत सोडविणार असल्याचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

