ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार्य: सहकार आयुक्त अनिल कवडे

ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार्य: सहकार आयुक्त अनिल कवडे
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ग्रामोद्योग सहकारी संघांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे जरुरी असून याकामी तालुका ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शुक्रवारी येथे केले. सहकारी संस्था स्वयंपूर्ण होण्यासाठी योजनांचा अभ्यास करून त्या सभासदांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने 'तालुका ग्रामोद्योग सहकारी संघाचे सक्षमीकरण' या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, उपाध्यक्ष हिरामण सातकर, महाराष्ट्र राज्य बलुतेदार संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने आदी उपस्थित होते.

कवडे म्हणाले की, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सचिवांच्या संबंधित निकष निश्चित करण्यासाठी 14 मार्चला संयुक्त बैठक आयोजित केली आहे. संस्थांचा कर्ज पुरवठा, ठेवी, व्याजदर, कर्ज व्यवस्थेत प्राथमिक स्वरूपाचे मुद्दे सोडविण्यासाठी प्रमुख बँकांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्यासाठी संस्थांनी सर्व मुद्द्यांची अभ्यासपूर्ण, अटी व नियमाला अनुसरून मांडणी करावी. ग्रामोद्योग संघांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे जरुरी आहे. व्यवस्थेची बलस्थाने, कच्चे दुवे, संधी आणि धोके तसेच भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन उत्पादन प्रक्रियेत अभ्यासपूर्ण बदल करावा. संपूर्ण व्यवस्थेत मूल्यांची जोड, प्रामाणिकपणा, तंटामुक्तता असावी आणि मूल्यांचा विकास व्हावा. आपली संस्था स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी सहकार संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, राज्य बलुतेदार सहकारी संस्था फेडरेशनचेे अध्यक्ष सुभाष पाटोळे, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, विविध संस्थांचे चेअरमन, सचिव आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news