Wild boar crop damage in Sonori
सासवड: सोनोरीसह दिवे परिसरात रानडुकरांच्या कळपांचा धुमाकूळ सुरू आहे. हातातोंडाशी आलेल्या पेरू, अंजीर, सिताफळ बागासह भुईमूग, मका व कडधान्य आदी पिकांचे हरीण, मोर, डुकरांनी नुकसान केले आहे. आतापर्यंत 100 एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या तोंडचा घास रानडुकरांनी हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
रानडुकराचा सर्वात जास्त उपद्रव सोनोरी, दिवे, काळेवाडी, झेंडेवाडी, वनपुरी भागांत सुरू आहे. सोनोरी येथील आत्माराम मारुती काळे, संतोष हनुमंत काळे, ज्ञानदेव दाजीराम काळे, अर्जुन रामचंद्र काळे, बबन पंढरीनाथ काळे, सुहास सर्जेराव काळे, परसराम विठ्ठल काळे, विलास साहेबराव काळे आदी शेतकर्यांचे फळबागासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकरी वैभव काळे म्हणाले, अंजीर, सिताफळ व पेरू बागामध्ये रानडुकरांचे कळप शेतात शिरून रातोरात मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. (Latest Pune News)
नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणी
सोनोरी परिसरात रानडुक्कर व वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या पिकांची शासन निर्णयानुसार शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सोनोरीचे माजी सरपंच रामदास साहेबराव काळे यांनी वनविभागाकडे केली आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात येत नसल्याने या भरपाईपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत असल्याचे सोनोरीचे माजी सरपंच संतोष काळे यांनी सांगितले.
रानडुकरांच्या उपद्रवामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची शासन निर्णयानुसार वेळेत शेतकर्यांना सक्षम भरपाई मिळावी, यासाठी शेतकर्यांनी परिपूर्ण ऑनलाइन अर्ज विहित मुदतीत दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित शेतकर्यांना माहिती दिली आहे.
- सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड