पुणे: मार्केट यार्डातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात तुम्हाला जायचंय? तर प्रथम तुम्ही गेटवर सुरक्षा रक्षकाच्या नोंदवहीत आपले नाव व मोबाईल नंबर नोंदवा, तरच आत प्रवेश दिला जाईल, असा अजब फतवा वरिष्ठांनी काढल्याने येणार्या नागरिकांची एकप्रकारे अडवणूक करण्याचा प्रताप सुरक्षा रक्षकाकडून सोमवारी (दि. 28) घडला.
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व समितीच्या मंडळातील बैठकीच्या माहितीसाठी आलेल्या पत्रकारांनाच याचा प्रत्यय आला. त्यामुळे शासनाच्या कार्यालयात स्वतःचे काम होईल की नाही, याची धास्ती असलेल्या नागरिकांची मंडळाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था होत असेल तर काम कधी होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. (Latest Pune News)
खरेतर शेतकरी अभिमुख पणन मंडळ करण्याची गरज असताना येणार्या-जाणार्यांना नावनोंदणी करण्याची मोहीम प्रशासन विभागाने कोणाच्या आदेशावर सुरू केली? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
“पणन मंडळाच्या सुरक्षा रक्षकाला गेटवर नावनोंदणी करण्याच्या कोणत्याही सूचना नाहीत. त्यांचे असे वागणे चुकीचे असून, मंडळात कामासाठी नागरिक येऊ शकतात. गैरसमजुतीतून असा प्रकार घडला असावा. आम्ही योग्य त्या सूचना देऊ.
- संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य, कृषी पणन मंडळ, पुणे