कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गतीने करा : उपमुख्यमंत्री अजित पवारांची सूचना

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गतीने करा : उपमुख्यमंत्री अजित पवारांची सूचना
Published on
Updated on

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज चौकातील 1100 मीटरचा उड्डाणपूल गोकूळनगरपर्यंत 1300 मीटर वाढविण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी जागामालकांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करून या कामाला गती देण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला दिल्या तसेच या रस्त्याच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या मागणीनुसार पवार यांनी शुक्रवारी उड्डाणपूल व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. या वेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, उपअभियंता धनंजय गायकवाड, प्रतीक कदम, उदयसिंह मुळीक, संदीप बधे आदी उपस्थित होते. या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून नियोजन करावे लागेल. भूसंपादनासाठी काही जागामालकांनी सहकार्य केले तसेच इतरांनी देखील करावे, महापालिका त्यांना योग्य मोबदला देईल, असेही पवार यांनी सांगितले.

200 कोटींच्या प्रस्तावास लवकरच मान्यता

राज्य सरकारकडून मिळणार असलेल्या 200 कोटींच्या निधीचा प्रश्न या वेळी दैनिक 'पुढारी'ने अजित पवार यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला असून, तो लवकरच मान्यतेसाठी कॅबिनेटसमोर येईल. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.

कोंढवा भागासाठी एकेरी वाहतूक

एसबीआय बँक ते खडीमशिन चौक या भागात एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. खडीमशिन चौकातून कात्रजकडे येण्यासाठी डावी बाजू म्हणजेच नवा रस्ता, तर जाण्यासाठी उजव्या बाजूचा म्हणजेच जुना रस्ता वापरण्यात येणार आहे. एकेरी वाहतूक केल्यामुळे कामास गती मिळणार असून, तीन ठिकाणी होणार्‍या भुयारी मार्गांचे काम एकाच वेळी करता येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. राजस सोसायटी चौकातून पुढे उड्डाणपूल वाढविण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news