बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक : व. पो. नि. बाळकृष्ण कदम | पुढारी

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक : व. पो. नि. बाळकृष्ण कदम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : परिवर्तन प्रकल्पांतर्गत संघर्षग्रस्त बालकांना रोजगारासाठी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विधिसंघर्षित बालकांना त्यातून बाहेर आणून समाजाच्या मुख्य प्रवाहात एकत्रित आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी व समाजातील समाजघटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी केले.येरवडा पोलिस ठाण्यात विधिसंघर्षित बालक आणि पालक यांच्या मेळाव्याचे शुक्रवारी (दि. 5) आयोजन केले होते.

या मेळाव्याला एकोणीस विधिसंघर्षग्रस्त बालक व 11 पालक उपस्थित होते. या वेळी सीवायडीए संस्थेचे समुपदेशक कौस्तुत यांनी मार्गदर्शन केले. लहान वयात अजानतेपणातून होणारे गुन्हे, वाढती व्यसनाधीनता तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचे वाढते प्रमाण यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण रोजगार तसेच कौशल्य विकास या संदर्भातही उपलब्ध संधीची त्यांनी माहिती दिली. या वेळी संघर्षग्रस्त बालकांच्या पालकांमधील अनिता लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. आम्ही सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असून, मुलांकडून झालेल्या चुकांमुळे तुमच्या सोबत आम्हाला देखील समाजात मोठा त्रास सहन करावा लागतो.

पुणे पोलीस व सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करण्यात येणार्‍या योजनांबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, मुलांची काळजी घेण्यासाठी आम्ही पालक म्हणून देखील दक्षता घेऊ, अशी ग्वाही देखील दिली. या वेळी पोलिस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव, सर्व लेन्स पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखेडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार जायभाय उपस्थित होते. पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 4 विभागाचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन प्रकल्पांतर्गत विधी संघर्ष ग्रस्त बालकांना सुधारणेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित विधी संघर्षग्रस्त बालक तसेच त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.

हेही वाचा

Back to top button