

पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आता तब्बल 79 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय- फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विभागामध्ये एकूण 102 रेल्वे स्थानके असून, उर्वरित स्थानकांवरही लवकरच ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पुणे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होत आहे. विभागातील सर्व स्थानकांवर अशी सुविधा असावी, आणि त्याबाबतची जनजागृतीचे फलक रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर लावावेत, अशीही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (Latest Pune News)
या सुविधेचा फायदा
प्रवासादरम्यान वाय-फाय सुविधेमुळे प्रवाशांना अनेक फायदे होणार आहेत. ते आता त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. यामुळे ते लाईव्ह ट्रेनची माहिती मिळवू शकतील.
प्रवासादरम्यान ते आपले मनोरंजन करू शकतील. तसेच, महत्त्वाचे ई-मेल तपासणे किंवा इतर ऑनलाइन कामे करणेही शक्य होणार आहे. विशेषतः लांबच्या प्रवासादरम्यान ही सुविधा प्रवाशांसाठी वेळ घालवण्याचे उत्तम साधन ठरू शकते.
... अशी वापरा उपलब्ध असलेली सेवा
आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमधील वाय-फाय सेटिंग्जमध्ये जा
उपलब्ध नेटवर्कच्या यादीतून रेल्वे वाय-फाय नेटवर्क निवडा
निवडल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक वेबपेज ओपन होईल
त्या पेजवर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा
तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) प्राप्त होईल
ओटीपी वेबपेजवर एंटर करा आणि ‘कनेक्ट’ बटणावर क्लिक करा
अशा प्रकारे, तुम्ही रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधेचा लाभ घेऊ शकता.
प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवणे, हे रेल्वे प्रशासनाचे प्राधान्य आहे. वाय-फाय ही आजच्या काळात अत्यावश्यक गरज बनली आहे आणि प्रवाशांना त्यांच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही अधिकाधिक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. प्रवाशांकडून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग