कसबा पेठ : मध्यवर्ती भागात का होतेय कोंडी? वाहतूक पोलिसांकडून नियोजनाची गरज

कसबा पेठ : मध्यवर्ती भागात का होतेय कोंडी? वाहतूक पोलिसांकडून नियोजनाची गरज

कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सण अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. यामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. होणार्‍या कोंडीत पेठांमधील लहान रस्त्यांवरही शनिवार-रविवार (दि. 8) कोंडीची भर पडल्याचे पाहायला मिळाले.

पेठांच्या भागात का होतेय वाहतूक कोंडी? दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिक शनिवार व रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत आहेत. पेठांमधील मध्यवर्ती भागातील होलसेल मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे सुटीच्या दिवशी दिसून येत आहे. यामुळे एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतुकीच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह
मध्यवर्ती भागातील मुख्य व अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. गल्लीबोळ, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस थांबलेल्या रिक्षा व दुचाकी आणि रस्त्यांवर अचानक वाढलेल्या वाहनांमुळे या भागात सुटीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी शिवाजी, बाजीराव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. दिवाळी सणाच्या दोन आठवडे आधीच ही परिस्थिती असेल, तर दिवाळीत काय होईल? तसेच वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

नेमकी का होतेय कोंडी..?
1) शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा परिसरात पदपथ व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी होत आहे.
2) नानावाडा ते मजूर अड्डा चौकादरम्यान तपकीर गल्ली परिसरात दुकानदारांच्या गाड्या रस्त्यावरच माल उतरविण्यासाठी थांबतात.
3) मजूर अड्डा चौक ते बेलबाग चौकात अनेक वाहनचालक जाता-जाता वाहनाचा वेग कमी करून देवाचे दर्शन घेतात.
4) मंडई परिसरात अप्पर, स्वारगेट आदी ठिकाणी जाणार्‍या रिक्षा रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या केल्या जातात.
5) बाजीराव रस्त्यावर शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराबाहेर पार्किंगच्या प्रतीक्षेत असलेली पर्यटकांची वाहने उभी केली जातात.

दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिक शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी बाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी होत आहे. मजूर अड्डा चौक ते बेलबाग चौकात अनेक वाहनचालक जाता-जाता वाहनाचा वेग कमी करून देवाचे दर्शन घेत असतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. तसेच आप्पा बळवंत चौकातील दोन बसस्टॉपवर विद्यार्थी रस्त्यावर येऊन बसची वाट पाहतात. त्यामुळे बस आल्यावर मागील वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नाही.
                                        – नंदकिशोर शेळके, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news