कसबा पोटनिवडणुकीत येऊन येऊन येणार कोण?

कसबा पोटनिवडणुकीत येऊन येऊन येणार कोण?

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार असलेल्या भागात उत्स्फूर्तपणे मतदान झाल्याने पोटनिवडणुकीत मतदान 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे, त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, असा दावा भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना केला.

ते म्हणाले की, पोटनिवडणुकीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. यामध्ये हक्काच्या प्रभागांमध्ये चांगले मतदान झाल्याने पश्चिम भागात आम्हाला मोठी आघाडी मिळेल, तर पूर्व भागात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने त्या भागात
विरोधकांच्या बरोबरीने मते मिळतील. या निवडणुकीत पक्षाच्या यंत्रणेसह माझी स्वतःची वेगळी यंत्रणा होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होईल आणि विजयाचा गुलाल आम्हीच उधळू, हा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.

नगरसेवक म्हणून मी निवडून आलेल्या शनिवार-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक 15 मध्ये 37 हजार एवढे मतदान झाले. त्यापैकी किमान 25 हजार मला मिळतील. येथेच मी दहा ते बारा हजारांचे मताधिक्य घेईन. तसेच लगतच्या नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक 29 मध्येही कमीत कमी मताधिक्य गृहीत धरले तरी दोन ते तीन हजारांचे मिळेल. भाजपचे हे दोन पारंपरिक पट्टे आहेत.

या दोन ठिकाणी घेतलेले मताधिक्य विरोधकांना पूर्व भागात तोडता येणार नाही, असे रासने यांनी सांगितले. पूर्व भागातील चार प्रभागांमध्ये भाजपच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. मतदारसंघाच्या बूथ पातळीपर्यंत आमची यंत्रणा कार्यरत होती. विरोधकांनी जरी वातावरण निर्माण केले असले तरी त्याचा उपयोग होणार नाही. सर्वच कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली. त्या चार प्रभागांमध्ये आमदार तसेच नगरसेवकांनी प्रयत्न केल्याने विरोधकांना फार मोठे मताधिक्य मिळणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा चांगला परिणाम झाला. तसेच चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांच्या प्रयत्नांमुळेही मतांमध्ये वाढ झाली. आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे लोहियानगर झोपडपट्टीतही मताधिक्य घेऊ, असा दावा रासने यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news