सोमेश्वरनगर : बसथांब्याची दुरुस्ती कधी? 3 वर्षे उलटले तरी अद्याप दुरुस्ती नाही

सोमेश्वरनगर : बसथांब्याची दुरुस्ती कधी? 3 वर्षे उलटले तरी अद्याप दुरुस्ती नाही

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती रस्त्यावरील करंजेपूल येथील बसथांब्याला टँकरची धडक बसून अर्धा भाग कोसळला होता. ही दुर्घटना होऊन तीन वर्षे उलटली तरी दुरुस्ती झालेली नाही. संबंधित कंपनीनेही याकडे लक्ष दिले नाही, ना एसटी महामंडळाने याची दुरुस्ती केली. त्यामुळे नव्यानेच बांधण्यात आलेला बसथांबा सध्या धूळ खात आहे. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
निरेकडून बारामतीला जात असताना टँकर करंजेपुलच्या उतारावरून खाली येत बसथांब्याला धडकला होता.

नव्यानेच उभारलेला थांबा या अपघातात जमीनदोस्त झाला. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला होता. त्या वेळी संबंधित कंपनीने बसथांब्याची दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षे होऊनही दुरुस्ती झालेली नाही. बसथांब्याचीही दुरुस्ती व्हावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

मु. सा. काकडे महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान, सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालय, सोमेश्वर माध्यमिक विद्यालय, उत्कर्ष आश्रमशाळा या ठिकाणी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. या ठिकाणी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्या बसस्थानकात अथवा काकडे महाविद्यालयाजवळ एसटीसाठी जावे लागते. बारामती आगारही याबाबत काहीही उपाययोजना करीत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news