पानशेत रस्त्यावरील पूल कधी होणार?

पानशेत रस्त्यावरील पूल कधी होणार?

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपये खर्च करून रुंदीकरणासह डांबरीकरण व काँक्रीटीकरण केलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर-मणेरवाडी येथील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. अशीच स्थिती सोनापूर-रुळे गावच्या हद्दीवरील रस्त्याची आहे. रखडलेल्या पुलांसह रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसन जोरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्धवट पुलांची कामे पूर्ण करण्याची, तसेच सोनापूर येथील अपघाती रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात खडकवासला धरण तीरावरील सोनापूर-रुळेजवळील रस्ता खचल्याने काही दिवस वाहतूक बंद केली होती.

त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून वाहतूक सुरू करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकार्‍यांसह खचलेल्या रस्त्याची पाहणी करून पावसाळा संपल्यानंतर तातडीने धरण तीरावरील रस्त्याची तांत्रिक बाबींची तपासणी, दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही गेल्या पाच महिन्यांत या रस्त्याची स्थिती 'जैसे थे' आहे.

पावसाळ्यात या ठिकाणी जवळपास दीडशे मीटर इतका रस्ता खचला आहे. एका बाजूला उंच डोंगर व दुसर्‍या बाजूला धरणाचे खोल पाणलोट क्षेत्र आहे. खचलेल्या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा या वाहनांना अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खचलेल्या रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांची गैरसोय
पानशेत-वरसगाव धरण खोर्‍यासह या भागात ये-जा करण्यासाठी पुणे-पानशेत हा प्रमुख मार्ग आहे. डावजे डोंगरावरील स्वयंभू श्री निळकंठेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी जाणारे भाविक, तसेच पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ वाढली आहे. धरण तीरावरील खचलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news