पुणे: इंग्लंड (यूके), अमेरिका (यूएसए), ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान, मलेशिया यांसारख्या परदेशांमध्ये जाण्यासाठी पुणेकरांना मुंबई, दिल्ली, चेन्नईतील विमानतळ गाठावे लागत आहेत. या देशांमध्ये थेट जाण्यासाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, गेली काही वर्षांपासून धावपट्टी (रन-वे) विस्तारीकरणाचे काम रखडले आहे, हे काम पूर्ण कधी होणार, असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे.
पुणे विमानतळावरून दररोज 180 ते 190-195 च्या घरात विमानोड्डाणे होत आहेत. यात फक्त तीन थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहेत. दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीन ठिकाणी पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. मात्र, अन्य ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाला धावपट्टी विस्तारीकरणाचा अडसर येत आहे.
यामुळे येथील धावपट्टीचे विस्तारीकरण होणे आवश्यक असून, याबाबत संबंधित प्रशासन, मंत्री खासदारांनी पुढाकार घेण्याची मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. तसेच, धावपट्टी विस्तारीकरणाबाबत आता राज्य शासन, भारतीय वायू सेना आणि स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालून हालचाली करण्याची गरज असल्याचे विमानतळावरील सूत्रांकडून समजले.
ओएलएस सर्व्हे म्हणजे काय?
लँडिंग किंवा टेकऑफ करताना किंवा विमानतळाभोवती विमान उडत असताना काही उंच बिल्डिंग, टेकड्या, झाडे, टॉवर्स इत्यादींसारखे विमानाच्या हवाई मार्गात येत असलेले व धोकादायक ठरू शकणारे अडथळे आहेत का, याविषयीचे केलेले सर्वेक्षण व त्या संबंधित सूचना यांना ओएलएस सर्व्हे (ऑबस्टेकल लिमिटेशन सरफेसेस सर्व्हे) असे म्हटले जाते.
ओएलएस अहवाल जाहीर करावा
ओएलएस अहवालात काय सूचना, काय नोंदी समोर आल्या आहेत. किती जागा भूसंपादन करावी लागणार आहे. त्यात खासगी किती, सरकारी किती, याबाबतची माहिती पुणेकरांसमोर आणावी, याकरिता ओएलएस (ऑबस्टेकल लिमिटेशन सरफेसेस) सर्व्हेचा अहवाल जाहीर करावा आणि याबाबतच्या अधिसूचना काढल्या आहेत का ? याबाबतही जाहीर करावे, पुणेकरांना माहिती द्यावी, अशी मागणीही हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.
पुणे विमानतळावरील डीजी यात्रा शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ओएलएस सर्व्हे करण्यात आल्याचे सांगत, या सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाल्यावर धावपट्टीचे विस्तारीकरण केले जाईल, अशी माहिती दिली होती. मात्र, हाच अहवाल पुणेकरांसाठी अजूनही गुलदस्त्यात असून, परिणामी, धावपट्टी विस्तारीकरणाच्या पुढील कार्यवाहीला विलंब होत असल्याची टीका विमान प्रवाशांकडून केली जात आहे.
नुसत्या बैठका नकोत, कार्यवाही करावी
धावपट्टी विस्तारीकरणाबाबत पुणे विमानतळावर मागे स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. त्यानंतर पुढे ठोस असे काहीच झाले नाही. आता शहरातील संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी नुसत्या बैठका घेऊ नयेत, ठोस पावले उचलून तत्काळ निर्णय घावा, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांना लांबपल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय थेट उड्डाणांसाठी पुण्याची धावपट्टी पुरेशी नसल्यामुळे, प्रवाशांना मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या शहरातून जावे लागत आहे. यामुळे अधिक पैसा आणि वेळ लागण्याबरोबरच प्रवाशांना फ्लाइट ट्रान्सफरसाठी अधिक श्रम (धावपळ) करावी लागते. पुणे शहरात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रोलियासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात व नियमित जाणारा प्रवासीवर्ग आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन, मान्यवरांनी घोषणा केल्याप्रमाणे पुण्यातून थेट लांबपल्ल्याची आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकर सुरू होणे आवश्यक आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ.