टेरेसवरील हॉटेलवर कारवाई कधी? विमाननगर, कल्याणीनगरमधील नागरिकांचा सवाल

टेरेसवरील हॉटेलवर कारवाई कधी? विमाननगर, कल्याणीनगरमधील नागरिकांचा सवाल

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: लुल्लानगर येथील सातव्या मजल्यावरील हॉटेलला आग लागल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने पुन्हा एकदा टेरेसवरील हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र विमाननगर, कल्याणीनगर, खराडी परिसरातील इमारतीच्या टेरेसवर चालणार्‍या हॉटेलवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी बाणेर येथे एका इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हॉटेलला आग लागली होती. त्या वेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील टेरेस हॉटेल व रेस्टॉरंटचा सर्व्हे करून 78 हॉटेलचालकांना नोटीस दिल्या होत्या. व्यवसाय सुरूच ठेवले आहेत. यातील काही हॉटेल ही राजकीय वरदहस्ताने सुरू आहेत.

विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातील दोन इमारतींच्या टेरेसवर पब सुरू आहेत. रात्रीचे कर्णकर्कश आवाज ऐकायला येतात. याचबरोबर विमाननगर चौक, फिनिक्स मॉलसमोरील इमारतीवर पब जोरात सुरू आहेत. कल्याणीनगरमधील डी-मार्टसह अन्य ठिकाणी टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. खराडीमधील युवान आयटी पार्कच्या परिसरातील इमारतीवर हॉटेल सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर या सर्वांना महापालिका बांधकाम विभागाने नोटिसा दिल्या आहेत.

मात्र, नोटिसा देऊन देखील संबंधितांचा व्यवसाय सुरूच आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका बांधकाम विभाग कारवाई करणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बुधवारी पाच अनधिकृत हॉटेलवर बांधकाम विभागाने कारवाई केली. याच पद्धतीची कारवाई विमाननगर, कल्याणीनगर, खराडी भागातील टेरेसवरील हॉटेलवर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news