

माणिक पवार
नसरापूर : अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणार्यास पाच वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. असे असूनही अनेक ठिकाणी चोरीचुपके सावकारी सुरू आहे. भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांत अवैध सावकारांचा विळखा वाढत असून, लोककल्याणाचे ठेकेदार आपणच आहोत, असे स्वयंघोषित म्हणविणारे गावगुंड सावकारांचे प्रस्थ वाढत आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, शेतीसाठी अथवा छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी सवर्सामान्यांना कर्ज घ्यावे लागते. मात्र, बँका अपुर्या कागदपत्रांचे कारण पुढे करून सोईस्कर कर्जपुरवठा करण्याचे टाळत असल्याने आपसूकच आर्थिक चणचण पाचवीलाच पुजलेल्या शेतकर्यांना अशावेळी ओळखीच्या व्यक्तीकडून व्याजाने रकमेची उचल करावी लागते. पैसे देत असताना पहिल्याच महिन्यात व्याजाची रक्कम आकारली जाते. 5 ते 20 टक्के प्रतिमहिन्यानुसार व चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी सुरू करून सावकारी सुरू असल्याची चर्चा भोर तालुक्यात झडत आहे. याबाबत पुराव्याअभावी सहकार निबंधक अथवा पोलिस ठाण्यात अद्याप एकही तक्रार नोंद नाही.
परिसरात जर कोणी बेकायदेशीर सावकारी करीत असेल, तर अशा सावकारांबाबत निडरपणे पोलिस ठाण्यात पुराव्यासह तक्रार द्यावी. सावकारी कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी असणार्या सावकाराच्या मुसक्या आवळू.
– सचिन पाटील, पोलिस निरीक्षक,
राजगड पोलिस ठाणे, नसरापूर