

पुणे : राजकीय घडामोडी आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. दिवाळीचे फटाके वाजण्याअगोदरच उमेदवारीचा 'एबी' फॉर्म मिळताच कार्यकर्त्यांकडून फटाके वाजविण्यात येत आहेत. ‘एबी' फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण त्यामुळेच संबंधित उमेदवार हा ‘एबी' फॉर्म देणार्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. पक्षाकडून जो उमेदवार निवडला जातो. त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह देखील दिले जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी या फॉर्मला 'एबी' फॉर्म म्हटले जाते.
माजी सनदी अधिकारी महेश झगडे ’पुढारी’शी बोलताना म्हणाले की, राजकीय पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना विविध कागदपत्रे आणि फॉर्म सादर करणे आवश्यक आहे. दस्तऐवजांमध्ये नागरिकत्व, वय व जात, फौजदारी प्रकरणे असल्यास त्याची माहिती, उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची मालमत्ता तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे. यातीलच सर्वांत महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे फॉर्म 'ए' आणि 'बी' या दोन फॉर्मना एकत्रितपणे ‘एबी फॉर्म’ म्हणून ओळखले जाते.
प्रामुख्याने फॉर्म 'ए' हा ‘मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य राजकीय पक्ष’ किंवा ‘नोंदणीकृत राजकीय पक्षा’ कडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्याला पक्षाच्या पदाधिकार्यांची नावे सांगणारा संवाद आहे. हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून येतो; ज्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का असणे आवश्यक असते. फॉर्मवर पक्षाने तिकीटवाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरीही आवश्यक असते. तर फॉर्म 'बी' हा राजकीय पक्षाच्या अधिकृत पदाधिकार्याकडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरला दिला जातो. हे पत्र रिटर्निंग ऑफिसरला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती देते, ज्याला पक्षाचे चिन्ह दिले जावे.
पक्षाकडून दिल्या जाणार्या फॉर्म 'ए’ मध्ये उमेदवाराचे नाव, त्यांचे पक्षातील पद व चिन्ह यांची माहिती असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य असणे आवश्यक असते. अर्ज बाद झाल्यास पक्षाने जाहीर केलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेरदेखील जाऊ शकतो.
प्राथमिक उमेदवाराचे नामांकन छाननीदरम्यान नाकारले गेल्यास चिन्ह आणि उमेदवारी वाटपासाठी पर्यायी नावदेखील पत्रात असते. फॉर्म बी हादेखील प्रमाणित करतो की, ज्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे, तो राजकीय पक्षाचा सदस्य आहे. आणि त्याचे नाव पक्षाच्या यादीमध्ये दिसते.