

रियाज देशमुख
राहुरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचे दोन प्रतिस्पर्धी निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार) विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे विरुध्द भाजपचे माजी आ. शिवाजी कर्डिले ही जुनीच लढाई नव्या जोमात पहावयास मिळणार आहे. सोळा वर्षानंतर आ. तनपुरे यांनी राहुरीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला असून त्याला पुन्हा खाली खेचण्यासाठी कर्डिले यांनी दंड थोपटले आहेत. जुन्या लढतीत नव्या डावपेचाने ही लढत लक्ष्यवेधी ठरलेच, शिवाय वंचितसह इतर अपक्षांमुळे निवडणुकीत यंदा चुरस वाढणार असल्याचेही चित्र आहे.
आ. प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि मातोश्री डॉ. उषाताई तनपुरे यांचा पराभव करत शिवाजी कर्डिले दोन वेळेस राहुरीचे आमदार झाले. मात्र तिसर्या वेळेस प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला.
सलग 25 वर्ष आमदारकी आणि नंतर खासदार झालेल्या प्रसाद तनपुरे यांच्या प्रदिर्घ सत्तेविरोधातील लाटेवर स्वार होत चंद्रशेखर कदम 2004 मध्ये भाजपचे पहिले आमदार झाले. 2009 मध्ये लोकसभेला तत्कालीन उमेदवार शिवाजी कर्डिलेंच्या हातात हात घालून प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्यासाठी मते मागितली, मात्र त्या कर्डिले पराभूत झाले. पुढे त्याच कर्डिलें विरोधात तनपुरेंची विधानसभेची लढत लक्षवेधी ठरली. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेला राहुरीची उमेदवारी शिवाजीराव गाडे यांना मिळणार असल्याचे दिसताच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आशिर्वादाने कर्डिलेंनी भाजपचे कमळ हाती घेतले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही पहिलीच निवडणूक होती. राहुरीत मतदान असतानाही राहुरीच्या नेत्यांमधील मतविभाजन कर्डिलेेंच्या पथ्यावर पडले. नगर व पाथर्डीतील एकगठ्ठा मतांमुळे कर्डिले राहुरीतून भाजपचे आमदार झाले. या निवडणुकीत राहुरीतून कर्डिले यांना 57 हजार 380 तर तनपुरे यांना 49 हजार 47 मते मिळाली होती. स्व. शिवाजीराजे गाडे यांना 42 हजार 141 तर अॅड. सुभाष पाटील यांना 14 हजार 484 इतके मते मिळाली होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत तनपुरेंसमोर कर्डिलेंसह स्व. गाडे यांचे मोठे आव्हान होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी जवळीक साधत गाडे यांनी तिकिट मिळविले. त्यावेळी उमेदवारी न मिळाल्याने डॉ. उषाताई तनपुरे यांनी धनुष्यबाण हाती घेत विधानसभा लढविली. मात्र याही निवडणुकीत शिवाजी कर्डिले विजयी झाले, ते दुसर्यांदा राहुरीचे आमदार झाले. 2016 मध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून प्राजक्त यांचा राजकीय श्रीगणेशा झाला. त्यावेळी त्यांना आमदार करण्याचा संकल्प शिवाजी गाडे यांनी केला होता, मात्र पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवाजी गाडे यांचे दुर्देवी निधन झाले. त्यानंतर 2019 ची विधानसभा प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा घरवापसी करत राष्ट्रवादीकडून लढविली. 2014 ला वडिल प्रसाद तर 2019 मध्ये मातोश्री उषाताई यांच्या पराभवाची सल प्राजक्त तनपुरे यांना होती. प्राजक्त तनपुरे-शिवाजी कर्डिले सरळ लढतीत राहुरीकरांनी तनपुरे यांना पाठबळ दिल्याने कर्डिले यांचा पराभव झाला. कर्डिलेंच्या 25 वर्षे आमदारकीला ब्रेक लावत प्राजक्त तनपुरे यांनी आई-वडिलांच्या पराभवाची परतफेड केली.
आ. तनपुरे आमदार होताच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. या सत्तेत आ. तनपुरेंना तब्बल 6 खात्याचे राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. कोरोना आपत्तीचा कालखंड सोडता तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून राज्यातील नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. तनपुरे यांचे राजकीय वजन वाढत असताना अन् महाविकास आघाडीचे वर्चस्व असतानाही शिवाजी कर्डिले यांनीही राजकीय डावपेच टाकून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळविले. तिकडे राष्ट्रवादीत फूट पडली पण प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांशी असलेली निष्ठा कायम ठेवली.
विकासात्मक कामे, जनसंपर्क कायम ठेवत उच्चशिक्षित, सुसंस्कृत तसेच प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे नेतृत्व असलेले आ. तनपुरे पुन्हा मतदारांसमोर जाणार आहेत. तर सत्तेत नसतानाही प्रशासनावर हातोटी ठेवत जनसंपर्काच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक करणारे कर्डिले हे महायुती सरकारच्या लोकहिताचे निर्णय घेवून तनपुरे विरोधात प्रचाराची राळ उडविण्याच्या तयारीत आहेत. या दोघांसोबतच वंचितसह इतरही अपक्ष निवडणूक मैदानात उतणार असल्याने त्याचा फटका कोणाला?, हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
राहुरीची लढत तनपुरे-कर्डिलेंत दुरंगी होणार की वंचित तसेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या भूमिकेमुळे तिरंगी, चौरंगी होणार याची उत्सुकता आहे. डॉ. जालिंदर घिगे, छत्रपती संभाजी प्रतिष्ठाणचे राजू शेटे, उबाठा गटाचे रावसाहेब खेवरे, प्रहारकडून सुरेश लांबे , शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवेंद्र लांबे हेही विधानसभेच्या आखाड्यात उडी घेण्याच्या तयारीत आहेत.