

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वजन करा, पण भीक देऊ नका…असा संदेश देत ते दृष्टिहीन दाम्पत्य रोज बाजीराव रस्त्यावर वजन काटा घेऊन बसतात…काही जण वजन करून त्यांच्या मेहनतीला आर्थिक मोबदला देतात, तर काही जण त्यांना दृष्टिहीन म्हणून भीक देतात…पण, भीक देण्यापेक्षा मेहनत करून कमावण्यावर दोघांचाही विश्वास आहे. भरउन्हात एका छत्रीला आधार बनवून हे दोघेही व्यवसायाला सकाळी सुरुवात करतात… एकमेकांना साथ देत अन् एकमेकांचा आधार बनत त्यांचे आयुष्य सुरू असून, मेहनत करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत…ही कहानी आहे काजल कांबळे आणि विशाल कांबळे यांची.
लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा मेहनत करून कांबळे दाम्पत्य हे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत. मेहनत करून त्या आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देत आहेत. काजल आणि विशाल कांबळे हेही शिकलेले आहेत. परिस्थितीमुळे कोणी नोकरी देत नसल्याने ते हा व्यवसाय करीत आहेत अन् या दाम्पत्याची एकमेकांना मोठी साथ असून, आज त्यांच्यासाठी हा व्यवसाय आधार बनला आहे. काजल कांबळे म्हणाल्या, 'आम्ही दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. मी सोलापूरची असून, विशाल हे पुण्यातले आहेत.
आमचे शिक्षण अंध शाळेत झाले. शाळेत एकत्र शिकायला असल्याने ओळख झाली. आमचा प्रेमविवाह झाला आहे आणि आम्ही एकमेकांची साथ देत इथंपर्यंत पोचलो आहोत. मी पाचवीपर्यंत शिकले असून, विशाल हे एसवायबीएपर्यंत शिकले आहेत. आमची मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत, आम्ही शिकलेलो असल्याने मुलांनीही शिकावे, हा विचार ठेवूनच मेहनत करून आम्ही मुलांना शिकवत आहोत. माझे पती व्यवसायात खूप साथ देतात आणि मी त्यांना साथ देते. चार ते पाच वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करीत असून, रोजचे दोनशे रुपये या व्यवसायातून कमावतो.'
मी एका ठिकाणी नोकरी करायचो. मी वर्षभर ते काम केले. आजारामुळे मला नोकरी सोडावी लागली. पण, भीक मागण्यापेक्षा काम करण्यावर आमचा नेहमी भर राहिलेला आहे. आजही दृष्टिहीन असल्यामुळे आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही वाटचाल करीत आहोत.
– विशाल कांबळे