सणसर येथे बुधवारी ऊस परिषद: राजू शेट्टी करणार मार्गदर्शन

राजू शेट्टी
राजू शेट्टी

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: सणसर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 2 नोव्हेंबर) ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी दिली.
याबाबत कदम म्हणाले की, उसाला एकरकमी 'एफआरपी' मिळाली पाहिजे. या वर्षीच्या गाळप हंगामात गाळप होणार्‍या उसाला 'एफआरपी' अधिक साडेतीनशे रुपये प्रतिटन मिळाले पाहिजेत.

हार्वेस्टरने होणार्‍या ऊसतोडणीमध्ये उसाची कपात प्रतिटन साडेचार टक्क्यांऐवजी दीड टक्का झाली पाहिजे. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऊस वाहतूकदारांना कै. गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे ऊसतोडणी कामगार उपलब्ध करून दिले पाहिजेत.

साखर कारखान्यांच्या मागील गाळप हंगामात गाळप झालेल्या उसाला 'एफआरपी' अधिक प्रतिटन दोनशे रुपये मिळाले पाहिजेत. साखर कारखान्यातील काटामारी संपुष्टात आणण्यासाठी वजन काटे ऑनलाइन झाले पाहिजेत. शेतीमालाच्या उत्पादन खर्चाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे.

शेतीपंपासाठी दिवसा बारा तास पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊस परिषदेसाठी मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news