Weather Update : राज्यात आगामी पाच दिवस पावसाचे

Weather Update : राज्यात आगामी पाच दिवस पावसाचे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या किमान व कमाल तापमानात वाढ झालेली असली तरी हे वातावरण आगामी 48 तासांत बदलणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा बदल होणार आहे. राज्यातील सर्वच भागात 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून 23 ते 25 दरम्यान येलो अलर्टचा इशारा राज्याला दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेली वार्‍याची चक्रीय स्थिती आणि पाकिस्तानातून उत्तर भारतात सक्रीय झालेला पश्चिमी चक्रवात या दोन प्रणाली एकाच वेळी सक्रीय झाल्याने राज्यात पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. श्रीलंका ते दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे त्या भागातून देशभर बाष्पयुक्त वार्‍याचा प्रवास सुरु झाला आहे. हे वारे राज्यात 48 तासांत दाखल होऊन 23 ते 26 दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

का पडणार पाऊस?

बंगालच्या उपसागरात नुकत्याच होऊन गेलेल्या चक्रीवादळाने सागर खवळला. श्रीलंका ते तामिळनाडूपर्यंत वार्‍याची गती वाढली तसेच तेथे कमी दाबाच्चा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी सुरु झाली. केरळ, तामिळनाडू राज्यात आगामी पाचही दिवस येलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त ढगांचा प्रवास सुरु झाला आहे. या कारणामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात 23 ते 26 तर विदर्भ, मराठवाड्यात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

66 बंगालच्या उपसागरातील वाऱ्याची स्थिती सारखी बदलत असल्याने वातावरणात मोठे बदल होत आहेत. सध्या किमान तापमानात घट असली तरीही त्या भागातून राज्यात बाष्षयुक्त वारे आगामी ४८ तासांत वारे दाखल होत आहेत. त्यामुळे राज्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान दिला आहे.

-अनुपम कश्यपी, विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news