

पुणे : पावसाळा आणि त्यानंतर उद्धभवणार्या अडचणी लक्षात घेता शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल 31 मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे. तसेच ग्राहकांनी जूनमध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तीन महिन्यांच्या धान्यवाटपास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 21 टक्के धान्य गोदामांमधून उचलण्यात आले आहे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्यवाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल 31 मेपर्यंत करून त्याचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी, अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यांकडून पूर्णक्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता, धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुटीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी.
पावसामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू झाली आहे. जिल्ह्यात 27 मेपर्यंत एकूण धान्यापैकी 21 टक्के उचल पूर्ण झाली आहे. हे धान्य एकूण 1859 दुकानांपैकी 531 दुकानांमध्ये पोहचले आहे. ही उचल करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उचल थोडी पुढे जाऊ शकते. पण, सरकारच्या सूचनेनुसार 30 जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्यवाटप पूर्ण करण्यात येईल.
महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
सुटीच्या दिवसाच्या एक दिवसअगोदर सुटीच्या दिवशी उचल करण्यात येणार्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी; जेणेकरून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल, असेही सुचविण्यात आले आहे.