

बारामती: इंदापूरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पॅनेलमध्ये आमच्याही पक्षाचे काही संचालक घ्यावेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या कारखान्याच्या संस्थापकांमध्ये माझे पणजोबाही होते. माझे आजोबा तेथे संचालक राहिले आहेत. तेथील निवडणूक बिनविरोध होईल का? हे सांगता येत नाही. भाजप तेथे पॅनेल करण्याच्या तयारीत आहे. पण, खरेतर त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कारखाना आर्थिक संकटात आहे, त्यामुळे यासंबंधी खा. सुळे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. कारखान्याच्या जडणघडणीत पृथ्वीराज जाचक यांचेही योगदान आहे. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. संचालक मंडळात आमच्या पक्षाच्याही चार-पाच लोकांना संधी मिळावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
राजकारणात परिस्थितीनुसार काही काही गोष्टी कराव्या लागतात
कुटुंब म्हणून पवार एकत्रच आहेत. आम्ही राजकारण आणि कौटुंबिक संबंध नेहमीच वेगळे ठेवले आहेत. राजकारणात एकत्र यायचे की नाही याचा निर्णय खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. आम्ही ज्युनिअर आहोत. शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच करावा लागेल, असे युवा नेते युगेंद्र पवार म्हणाले.
काका,काकी बद्दल आदर कायम
वाढदिवशी खा. सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेत आशीर्वाद घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या माझ्या काकी आहेत. आम्ही ३०-३२ वर्ष एकत्र होतो. मग ते राजकारण म्हणून असो की कुटुंब म्हणून असो. एखादे वर्ष आमचे वेगळे गेले म्हणजे सगळे संपते या विचारांचा मी तरी नाही. काकींबद्दल (खा. सुनेत्रा पवार) माझ्या मनात प्रेम, आदर आहे, तो कमी होण्याचा प्रश्न नाही. काका अजित पवार असतील किंवा काकी नाती कायम आहेत, यापुढेही आदर कायम राहिल असे ही युगेंद्र पवार यांनी सांगितले.