पिंपरी : लक्ष्मणभाऊ आम्ही एवढेही कृतघ्न नाही! भाजपच्या पाठिशी उभे राहण्याचा पिंपळे गुरवकरांचा निश्चय

पिंपरी : लक्ष्मणभाऊ आम्ही एवढेही कृतघ्न नाही! भाजपच्या पाठिशी उभे राहण्याचा पिंपळे गुरवकरांचा निश्चय

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे पिंपळे गुरवचे शिल्पकार होते. आजचे पिंपळे गुरव हे फक्त आणि फक्त त्यांचीच देण आहे. आम्ही एवढेही कृतघ्न नाही की, त्यांनी या भागासाठी दिलेले योगदान लगेच विसरून जाऊ. त्यांचेच बोट धरून मोठे झालेल्यांनी कितीही बोलघेवडेपणा केला, येथे येऊन कितीही ढोल वाजवत प्रचार केला, तरी पिंपळे गुरवमधून एकही मत विरोधकांना जाणार नाही. येथील शंभर टक्के मतदान फक्त आणि फक्त लक्ष्मणभाउ जगताप म्हणजे भाजपलाच देणार, असा ठाम निश्चय पिंपळे गुरवमधील जनतेने सोमवारी (दि. 20) केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप, शिवेसना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी होम पीच असलेल्या पिंपळे गुरवमध्ये पदयात्रा, गाठीभेटी घेऊन प्रचाराचा धुरळा उडवला.

या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, रविना आंगोळकर, अमर आदियाल, राहुल जवळकर, शशिकांत दुधारे, पंचशिला दुधारे, कावेरी जगताप, वैशाली जवळकर, दुर्गा आदियाल यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

घरच्या मैदानातच त्यांनी केलेल्या प्रचारावर दिवंगत आमदार लक्ष्मणभाउ जगताप यांच्या निधनाच्या दुःखाचे सावट होते. पदयात्रेदरम्यान अश्विनी लक्ष्मण जगताप जेथे जेथे जातील, तेथे महिला व नागरिक गहिवरलेल्या स्वरातच त्यांचे स्वागत करत होते. आपल्या पिंपळे गुरवकरांवर ही वेळ यायला नको होती, अशी भावना नागरिक व्यक्त करत होते.

जगताप कुटुंब हे आमचे कुटुंब आहे. पिंपळे गुरवमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक जगताप कुटुंबाचाच सदस्य आहे. लक्ष्मण जगताप आमचे होते. साधा रस्ताही नसल्यापासून ते आतापर्यंत पिंपळे गुरवचे नेतृत्व करताना लक्ष्मण जगताप यांनी या भागाचा जो काही कायापालट केला, तो शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आज पिंपळे गुरवमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. चांगले रस्ते आहेत.

उद्याने आहेत. पाणी आहे. बाकीच्याही मूलभूत सुविधा भरपूर आहेत. आम्हाला हे सर्व उपलब्ध करून देणारा लोकनेता आम्हाला लवकर सोडून गेल्याने केवळ जगताप कुटुंबच नाही, तर सर्व पिंपळे गुरवकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना येथील नागरिकांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना बोलून दाखवल्या.

त्यांच्या पश्चात आम्ही सर्व पिंपळे गुरवमधील जनता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपल्या इथलेच काही जण विरोधकांना जाऊन मिळालेले असले तरी आम्ही पिंपळे गुरवकर इतकेही कृतघ्न नाही की, लक्ष्मण जगताप यांनी या भागाच्या विकासासाठी दिलेले योगदान एवढ्या लवकर विसरू.

आपल्यातील फितुरांना सोबत घेऊन विरोधकांनी पिंपळे गुरवमध्ये कितीही ढोल वाजवत ऊर बडवला तरी आमच्या निश्चयामध्ये तसूभरही फरक पडणार नाही. पिंपळे गुरवमधून एकही मतदान विरोधकांना देणार नाही, असा दृढनिश्चय आम्ही केल्याचे नागरिकांनी जागोजागी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news