

Jitendra Dudi water scheme orders
पुणे: ‘हर घर जल-जलजीवन मोहिमे’अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेबरोबरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने समन्वयक अधिकार्यांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक पार पडली. या प्रसंगी अधिकारी-कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Latest Pune News)
डुडी यांनी स्पष्ट केले की, ‘जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा किंवा अंगणवाडी पाण्याविना राहता कामा नये. योजनांचा प्रस्ताव सादर करताना शाश्वत पाणीसाठा, प्रकल्पाकरिता आवश्यक जागेची उपलब्धता, पर्यायी व्यवस्था, सोलार प्रकल्प तसेच योजना चालविणारी यंत्रणा यांचा सर्वांगीण विचार करावा.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रलंबित कामांना गती देणे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून अडचणी सोडवणे, पूर्ण झालेल्या योजनांचा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करणे यावर भर दिला जावा. तसेच, या योजनांना महावितरणने तातडीने वीज जोडणी करून द्यावी. पाणीपुरवठा योजनांमध्ये शाश्वत पाण्याच्या स्रोतांचा समावेश करूनच अटल भूजल योजनेअंतर्गत आराखडे सादर करावेत, यापूर्वी जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करून जलस्रोतांची तपासणी करणे आवश्यक असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सीईओ गजानन पाटील म्हणाले की, जलजीवन मोहिमेत जिल्ह्यातील 1,836 ग्रामपंचायतींचा समावेश असून, या माध्यमातून 9 हजार 335 वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. जागेबाबत प्रलंबित असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. स्थानिक पातळीवरील प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी सातत्याने समन्वय ठेवावा.
बैठकीत जलजीवन मोहिमेतील कामांची सद्य:स्थिती, प्रस्तावित आराखडे, प्रगतीपथावरील कामे, अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर चर्चा झाली.