

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे; परंतु परिसरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून त्याला छोट्या तळ्याचे स्वरूप आले आहे. गाव भागात, स्टेशन परिसरात इंद्रायणी वसाहत, वतननगर, यशवंतनगर तळेगाव-चाकण महामार्गावर, स्टेशन चौक स्वप्ननगरी इत्यादी ठिकाणी खड्ड्यांतून पावसाचे पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणाला छोट्या तळ्याचे स्वरूप आले आहे; मात्र या साचलेल्या पाण्यामुळे येथून ये- जा करणार्या पादचार्यांना तसेच वाहनचालकांना ते धोकादायक ठरत आहे.
या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन चालकांना छोटे अपघात घडत आहेत. तसेच या साचलेल्या पाण्यात परिसरातील बालचमू खेळत असतात. त्यामुळे या साचलेल्या पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येत आहे.तरी प्रशासनाने दखल घेवून शहर परिसरातील खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.