

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या तापमानामुळे उरुळी देवाची, फुरसुंगीसह वाड्या-वस्त्यांवरही पाणीटंचाई जाणवू लागली असून, महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर रहिवाशांची गर्दी वाढली आहे. पालिका प्रशासनाने टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. पालिकेच्या कचरा डेपोमुळे मंतरवाडीसह उरुळी देवाची, फुरसुंगीतील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या गावात पुणे महापालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.
प्रामुख्याने पिण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नळाद्वारे येणार्या पाण्याचा वापर इतर करणांसाठी केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या परिसरातील पाणीसाठा कमी होत असल्याने पाण्याची मागणी वाढत जाते. वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या काळात टँकर विकत घेऊन पाणीपुरवठा केला जात असे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतींची दमछाक होत असे. त्यामुळे नाइलाजास्तव येथील रहिवाशांना खासगी टँकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागे.
सध्या या गावांचा पालिकेत समावेश झाला असला, तरी येथील परिस्थिती बदलली नसून उलट खासगी टँकरची मागणी वाढली आहे. पाणी साठवणुकीची सोय नसलेल्या तसेच आर्थिक अडचणीमुळे पाणी विकत घेणे परवडत नसलेल्या रहिवाशांना पालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे पालिकेचा टँकर काही मिनिटांतच रिकामा होतो. टँकरच्या वेळेत उपस्थित राहू न शकणार्यांना पाण्यासाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत आहे.
होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी या म्हणायला नुसत्या वाड्या आहेत. मात्र, या गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा ही दूरची गोष्ट असली, तरी ज्या लगबगीने पालिका कर गोळा करते, त्याच तत्परतेने पालिकेने या वाड्यांसह उंड्री, पिसोळी या गावांमध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवून येथील पाणीटंचाई दूर करावी.
– सुभाष थिटे,
माजी ग्रामपंचायत सदस्य, होळकरवाडी