हडपसर : जलवाहिनी फुटल्याने पाणीटंचाईचे संकट; गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना पुरवठाच नाही

File Photo
File Photo
Published on
Updated on

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: जलवाहिनी फुटल्याने गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने वैदूवाडी, गोसावीवस्ती, जुन्या व नव्या म्हाडा कॉलनीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. या भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या असून, निवेदनेही दिली आहेत. मात्र, या भागाचा पाणीप्रश्न अद्यापही 'जैसे थे' आहे.

त्यात मागील तीन दिवसांपूर्वी वैदूवाडी रेल्वे गेटपासून सोलापूर रस्त्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील जलवाहिनी फुटली आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाच्या आधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नीलम चव्हाण, करुणा प्रक्षाळे म्हणाल्या, 'वैदूवाडी, महात्मा फुलेनगर, खजुरेवस्ती, मातंगवस्ती, मार्केंडेयनगर, गोसावीवस्ती, बिराजदारनगर, स्वप्नपूर्ती, सोसायन, साई सोसायटी, जुनी-नवीन म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, समर्थनगर, गोपाळवस्ती, कोकणेवस्ती, सार्थक सोसायटीतील नागरिकांना एरव्हीसुद्धा कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे.'

पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी रामटेकडी येथे आहे. मात्र, कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने मोटार लावून पाणी घ्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना म्हाडाच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर पाणी न्यावे लागत असल्याचे रशिदा खान यांनी सांगितले. भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष इम्तीयाज मोमीन म्हणाले, 'या भागात जलवाहिनी फुटल्याने पाणी नागरिकांना मिळत नव्हते. यामुळे रामटेकडी पाँईटवरुन टँकर भरुन परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले.'

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
जुनी जलवाहिनी जीर्ण झाली असून, ती फुटली आहे. दुरुस्तीचे साहित्य मिळत नाही. ते फॅबि—केशनमधून बनवून घेतले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल भाटकर यांनी सांगितले

मागील तीन दिवसांपासून पिण्यासाठी मगरपट्टा, हडपसर परिसरातून सायकलवरून कॅन भरून पाणी आणावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांनी पाणी कोठून आणि कसे आणायचे? नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.

                                                     -कावेरी वाघमारे, रहिवासी, गोसावीवस्ती

जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना कळवले आहे. दुरुस्त लवकर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या परिसराला मुबलक पाणी मिळाले पाहिजे.

                                                             -आनंद आलकुंटे, माजी नगरसेवक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news