

दत्तात्रय नलावडे :
खडकवासला : खडकवासला धरणात बुडून पर्यटकांचे मृत्यू होण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून, धरण चौपाटीवर दहा सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, कारवाईचे फलक लावूनही धरणात उतरणार्या पर्यटकांवर अद्याप दंडात्मक कारवाई होत नाही. त्यावरून वर्दळ असलेल्या धोकादायक दुर्घटनाग्रस्त ठिकाणांच्या सुरक्षाव्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
गोर्हे खुर्द येथे सोमवारी (दि. 15) खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला, तर पाच मुलींना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून तातडीने दहा सुरक्षारक्षक धरणाच्या चौपाटी परिसरात तैनात केले आहेत. असे असले तरी दुर्घटना घडलेल्या गोर्हे खुर्द तसेच पर्यटकांची वर्दळ असलेल्या धरणक्षेत्रातील धोकादायक पाणवठे, मुठा कालवा, पानशेत, वरसगाव धरण परिसरातील दुर्घटनाग्रस्त ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
धरणक्षेत्रात उतरणार्यांवर पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्याचे फलक जलसंपदा विभागाने धरण चौपाटी परिसरात लावले आहेत. कठडे ओलांडून पर्यटक थेट धरणात पोहण्यासाठी व अंघोळीसाठी उतरत असल्याने मंगळवारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरक्षारक्षक पाहरा देत असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, त्यांनाही दंडात्मक कारवाईबाबत माहिती नसल्याचे दिसून आले.
पर्यटकांना रोखण्यासाठी धरणतीरा वरील पुणे-पानशेत रस्त्यावरील धरणतीरावर बांबू उभे केले आहेत. मात्र, ते ओलांडून पर्यटक थेट धरणात धाव घेत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागत आहे. दंडात्मक कारवाई करण्याचे फलकही धरण
माथ्यापासून चौपाटीपर्यंत लावण्यात आले आहेत. मात्र, पाण्यात उतरणार्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मौजमजा बेततेय पर्यटकांच्या जिवावर!
खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रालगत आलिशान फार्म हाऊस, हॉटेल, रिसॉर्ट आहेत. अनेक हॉटेलची बांधकामे थेट जलाशयालगत सुरू आहेत. सुटीच्या दिवशी या ठिकाणी बेकायदेशीर पार्ट्या सुरू असतात. तसेच धरणक्षेत्रात पार्ट्या, मौजमजेसाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. धरणात उतरून मौजमजा करताना बुडून पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. यामुळे धरणाचे पाणलोटक्षेत्र मृत्यूचे आगार बनले आहे. दुर्घटना रोखण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वर्षानुवर्षे दंडात्मक कारवाईचे फलक धरण परिसरात लावले आहेत. मात्र, एकाही पर्यटकावर कारवाई केली जात नाही. प्रतिबंधकात्मक उपाययोजना कागदावरच आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास धरणात उतरणार्यांवर पायबंद बसेल. मुठा कालव्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
– विजय मते, अध्यक्ष, खडकवासला विधानसभा, मनसेधरणात उतरणार्या पर्यटकांना रोखण्यासाठी चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वावर दहा सुरक्षारक्षक नेमले आहेत. दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत, दंडाची पावती पुस्तके व इतर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. धरणक्षेत्रातील इतर ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत वरिष्ठांना माहिती दिली जाणार आहे.
– मोहन बदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग