

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील नैसर्गिक बदलांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे. गेल्या सव्वातीन वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिका सध्या मावळातील पवना धरणातून दिवसाला 510 एमएलडी पाणी घेत आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. यासाठी निघोजे बंधारा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारले आहे. त्याचबरोबर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे. पण पाणी उचलण्यास अजून सुरुवात झाली नाही.
वाकड आणि चिखली भागातील आणि देहू-आळंदी रस्त्यावरील सर्वच सोसायट्यांमध्ये खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिकेकडे आल्या आहेत. येथील पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी येथील सोसायट्यांच्या पदाधिकार्यांनी महापालिकेकडे केली आहे. चिखली भागातील पाटील नगर, बगवस्ती, देहू-आळंदी रोडवरील सर्वच सोसायट्यांना, तसेच चिखलीमधील देहू-मोशी रोडवरील सर्व सोसायट्यांना मागील 15 दिवसांपासून खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा विभागाच्या व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सर्वच अधिकार्यांकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी काही ठिकाणी यंत्रणा काम करीत आहे. मात्र, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न हवेत
शहराची लोकसंख्या जर 30 लाखांपर्यंत असेल तर दरडोई 170 लिटर पाणी प्रत्येक घराला मिळायला हवे. सध्या फक्त 50 लिटर पाणी प्रत्येकाला मिळते आहे. मग, 120 लिटर पाणी कुठे जाते, हा प्रश्न निर्माण होतो. शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दिवसाला -किमान 1 व जास्तीत 5 टँकर पाणी मागवावे लागते. आमच्या महासंघाच्या 3 हजार सोसायट्या,त्यातील जवळजवळ निम्म्या सोसायट्यांमध्ये टँकर मागवावे लागतात.
एका टँकरला 800 रुपये खर्च याप्रमाणे त्यांना हा भुर्दंड सहन करावा लागतोय. पदाधिकारी आणि संबंधित महापालिका अधिकारी यांच्यात अनेक बैठका झाल्या. त्यात त्यांनी 40 टक्के पाणी गळती होते, याची कबुलीही दिली. मात्र, ही पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न व्हावे. आम्हाला बर्याचदा उत्तर असे मिळते की, पाणी वाढवून देऊ. पाणी वाढवून उपयोग काय?, जर पाणीगळतीच थांबवली जात नसेल तर, वाढवलेले पाणी नागरिकांपर्यंत पोहोचेल का?, असा प्रश्न पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघाचे अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
एप्रिल, मे महिन्यात समस्या बिकट होईल
मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या एवढी बिकट असेल तर, एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याची अवस्था किती अवघड होईल. या प्रश्नावर महापालिका अधिकार्यांनी लवकरच तोडगा काढावा, असे सोसायट्यांच्या पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.
काही ठिकाणी अजूनही पाणी नाही…
गेल्या 20 दिवसांपासून आमच्या सर्वच सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. आम्ही सोसायट्यांचा पाणीप्रश्न फेडरेशनच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकार्यांसमेार मांडला. त्याप्रमाणे काही दिवसांनी आमच्या भागातील बहुतांश सोसायट्यांमध्ये पाण्याचा पुरवठा हळूहळू सुरळित होत आहे. आता काही थोड्या सोसायट्यांमध्ये हा प्रश्न कायम आहे. पण येथेही लवकरच पाणीपुरवठा सुरळित होईल, असे वाटते, अशी अपेक्षा चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी व्यक्त केली आहे.
वाढती मागणी पूर्ण करू शकत नाही…
पिंपरी चिंचवड महापालिका पवना धरणातून 510 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30, असे एकूण 540 एमएलडी पाणी उचलते. पाणी भरपूर प्रमाणात आहे. आतापर्यंत ज्या ज्या सोसायट्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या ठिकाणी महापालिका अधिकारी पाहणी करून आले आहेत. काही ठिकाणी तांत्रिक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळित करण्यात आला आहे. काही मोठ्या सोसायट्यांत सांडपाणी प्रकल्प, रेन हार्वेस्टिंग प्रकल्प किंवा बोअरवेल नाहीत. त्यामुळे त्यांना सध्या पाणी अपुरे पडते. महापालिका त्यांची वाढती पाण्याची मागणी पूर्ण करू शकत नाही. म्हणून ते खासगी टँकर मागवतात, अशी माहितीही सवणे यांनी दिली.