

पुणे : पुण्यात मेट्रोचे काम सुरू आहे. शिवाजीनगर येथे सिमला ऑफिससमोर मेट्रोचे काम करत असताना शिवाजीनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. ही पाईपलाईन फुटल्यावर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन ही गळती थांबवली. ही घटना सोमवारी (दि.१२) दुपारी ३ च्या दरम्यान घडली.
सध्या उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. वाढलेल्या पाणी मागणीमुळे शहरात अनेक भागात समान पद्धतीने पाणी पुरवण्यास पालिकेला अडचणी येत आहेत. तर काही ठिकाणी कमी दाबाने व उशिराने पाणी पुरवठा केला जात आहे. कात्रज कोंढवा भागात तर दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात पुण्यात शिवाजीगर येथे शिमला ऑफिसच्या जवळ जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्यावर तब्बल १० ते १२ फूट उंच पाण्याचे कारंजे उडत होते.